पंढरपूर : सत्ता नसताना मराठा आक्रमक भूमिका मांडणारे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आरक्षण प्रश्नावर आता का गप्प आहेत, असा सवाल उपस्थित करून सत्ताधारी ओबीसी व मराठा समाजाला भीती घालत आहेत आणि यातूनच वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांकडून केला जात असल्याचा आरोप अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी केला.
पंढरीतील मुरारजी कानजी धर्मशाळेत मेळावा आयोजित केला होता. यावेळी अखिल मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण, माजी नगरसेवक किरण घाडगे, सुमित शिंदे, अमोल पवार, श्याम साळुंखे उपस्थित होते.
मागील सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकविण्याचे काम विद्यमान सरकारचे आहे. मात्र कधी यांचा वकील हजर नसतो तर कधी प्रभावी युक्तिवाद होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठ्यांचा पक्ष आहे. त्यामुळे सत्तेत आल्यावर मराठा समाजाच्या खूप अपेक्षा होत्या. पण त्या फोल ठरल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील एक लाख तरुणांना उद्योजक बनण्याचे ध्येय आहे. मला अध्यक्षपदाची संधी मिळाल्यापासून वीस हजार तरुणांना आर्थिक मदत केली. या माध्यमातून बाराशे कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले. यामध्ये सोलापूर जिल्ह्याला ५० कोटींहून अधिक कर्जाचे वाटप केल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे लॉकडाऊन असतानाही ६० कोटी रुपये व्याज या तरुणांनी भरल्याचे यावेळी नरेंद पाटील यांनी सांगितले.
फोटो : १२ नरेंद्र पाटील
मराठा समाजामध्ये उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी घेण्यात आलेल्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना आमदार नरेंद्र पाटील.