उत्तर सोलापूर : चोऱ्या तर सतत होतात, सीसीटीव्हीत चोरटे दिसतात, पोलिसात तक्रार दिली तरीही चोर सापडत नाहीत. त्यामुळे लोकांनी तक्रारी देणेच बंद केले आहे. आपण तरी न्याय द्यावा, असे निवेदन छावा व जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे.
सोमवारी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील व जनहित शेतकरी संघटनेने तालुकाध्यक्ष शशिकांत थोरात यांनी अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. दोन वर्षांत बीबीदारफळ येथे सातत्याने चोऱ्या होत आहेत. बीबीदारफळ तलावात पाणी असल्याने लगतच्या शेतकऱ्यांची बागायती शेती आहे. तलावाभोवती असलेल्या विद्युत मोटारींच्या केबल, स्टार्टर, मोटारी व मोटारीच्या आतील वायंडिंगच्या तारांची सातत्याने चोरी होते.
पोलिसांना कळविल्याने पोलीस आले व लिहून घेऊन गेले तर पुढे काहीच होत नाही. थोड्या दिवसानंतर पुन्हा केबल, मोटारी व इतर चोऱ्या होतात.
मागील आठवड्यात गावाच्या मध्यभागी असलेली चार घरे फोडून सोने घेऊन गेले.
त्यातच शुक्रवारी रात्री ह. भ. प. वसंत साठे यांचे घरफोडून चार तोळे दागिने घेऊन गेल्याचे निवेदनात म्हटले आहे.
-----
लोक रात्र जागून काढतात..
ह. भ. प. वसंत साठे महाराजांच्या वस्तीवर ११ महिन्यांच्या बाळाला मारण्याची धमकी देत उचलून घेऊन गेले व चोरी केली. या प्रकारामुळे वस्तीवर राहणारे भयभीत झाले आहेत. गाव व वस्तीवरील लोक रात्र जागून काढत आहेत. गावात कोरोना अन् शेतात चोरट्यांची दहशत आहे.