'राष्ट्रवादीने धनंजय मुंडें अन् अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्ष का केलं नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 12:57 PM2021-06-30T12:57:35+5:302021-06-30T12:58:38+5:30
ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावरून पडळकर हे घोंगडी बैठकांसाठी आज सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली.
सोलापूर - भाजपा नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पवार कुटुंबीयांवर टीका करताना दिसून येतात. पडळकर यांनी सोलापूर दौऱ्यातही शरद पवार यांना भावी पंतप्रधान पदासाठी शुभेच्छा म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस हा साडेतीन जिल्ह्यांपुरता पक्ष असल्याची बोचरी टीका केली. तसेच, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही त्यांनी राष्ट्रवादीला टार्गेट केले.
ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावरून पडळकर हे घोंगडी बैठकांसाठी आज सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक ओबीसी नेते आहेत. या महाविकास आघाडी सरकारमध्ये ओबीसी नेते असतानाही त्यांना उपमुख्यमंत्रीपद का मिळाले नाही. तसेच धनंजय मुंडे, अमोल कोल्हे यांना प्रदेशाध्यक्ष का केले नाही, असा सवाल गोपीचंद पडळकरांनी विचारला आहे. भाजपमध्ये सर्वाधिक आमदार ओबीसीचे असून सत्ता असतानाही भाजपने अनेक ओबीसी समाजातील नेत्यांना संधी दिल्याचंही ते म्हणाले.
दरम्यान, रोहित पवार हे पोस्टर बॉय आहेत, अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी निधी देण्याची नुसतीच घोषणा केल्याची आठवण त्यांनी करुन दिली. तसेच, दिल्लीत भाजपाविरोधी पक्षांच्या झालेल्या बैठकीवरही त्यांनी टीका केली. कोंबड्याला वाटते मी आरवल्याशिवाय उजाडत नाही; अशा कोंबड्यांनी दिल्लीत बैठक घेतली, असेही पडळकर यांनी म्हटलं.
याचिकाकर्ता काँग्रेस नेता
राज्यातील ओबीसींचं स्थानिक स्वराज संस्थामधील राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे, मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही राजकारणात चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. राजकीय नेतेमंडळींकडून ओबीसी आरक्षणाचा फुटबॉल होत आहे. सत्ताधाऱ्यांकडून केंद्र सरकारवर तर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांनाच यासाठी जबाबदार धरण्यात येत आहे. त्यातच, याचिकाकर्त्यावरही संघाचा कार्यकर्ता असल्याचे आरोप करण्यात आला होता. त्यानंतर, पडळकर यांनी याचिकाकर्ता हा काँग्रेस नेता असल्याचे सांगितले.