करमाळा (जि. सोलापूर) : उसाला गुजरातमध्ये प्रतिटन पाच हजार रुपये, पंजाबमध्ये तीन हजार ३०० रुपये दर मिळतो, मग महाराष्ट्रात दोन हजार ५०० रुपयेच का, असा सवाल शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी करमाळा येथे पत्रकारांशी बोलताना केला.शेतकरी संघटनेच्या वतीने जनप्रबोधन यात्रेनिमित्त ते करमाळ्यात आले होते. या वेळी पत्रकार परिषदेत रघुनाथ पाटील म्हणाले, २००४ पूर्वी राज्यातील शेतकरी संघटना अतिशय मजबूत होत्या. शेतमालाचे आणि उसाचे दर ठरवत होत्या. पण, शेतकऱ्यांना कमकुवत केल्याशिवाय राज्य करता येत नाही, हे लक्षात ठेवून राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या संघटनांमध्ये फूट पाडली. त्यामुळेच राजू शेट्टी यांना खासदार, सदाभाऊ खोत यांनी मंत्री केले, असा आरोप करीत उसाच्या एफआरपीचेही सध्या तुकडे पडत आहेत, असे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांचे भांडवल करून शेतकरी नेते सत्तेत गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना कधी न्याय मिळाला नाही. सध्याच्या सरकारमध्ये कारखानदारांचे प्रतिनिधी बसले आहेत. तरीही उसाच्या दराबाबतही अनिश्चितता आहे. सरकार उसावर प्रतिटन चार हजार रुपये कर आकारते. परंतु, उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार रुपये देताना सरकार व कारखानदारांचे हात थरथरतात, असे पाटील म्हणाले.
"‘उसाला महाराष्ट्रातच चांगला दर का नाही?’"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 3:09 AM