सोलापूर : विधान परिषदेला सतत पैसेवाल्या उमेदवारांची चर्चा होते. झेडपीचा एखादा सदस्य उमेदवार का होऊ शकत नाही, असा प्रस्ताव पुढे रेटत अपक्ष उमेदवारांनी एकत्र येण्याची तयारी सुरू केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात नुकतीच बैठक झाली. या बैठकीत सोलापूरविधान परिषदेसाठी आगामी उमेदवार कोण असावा, यावर चाचपणी करण्यात आल्याचे वृत्त गुरुवारी ‘लोकमत’मध्ये ठळकपणे प्रसिद्ध झाले. जिल्हा परिषदेत हा विषय चर्चेचा ठरला. आगामी विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीविरुद्ध भाजपच्या उमेदवारात लढत होणार हे चित्र स्पष्टच आहे. विद्यमान आमदार प्रशांत परिचारक यांना भाजपकडून पुन्हा संधी मिळेल, असे सांगण्यात येत आहे. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल, यावर चर्चा सुरू झाली आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी खर्च करणाऱ्या उमेदवारांचीच नावे चर्चेत येतात. झेडपीच्या सर्वसामान्य सदस्याला ही संधी का दिली जात नाही? असा प्रस्ताव राज्य जिल्हा परिषद सदस्य संघटनेकडून दिला गेला आहे. सदस्यांनी यावर चळवळ उभी केल्यास असा बदल घडू शकेल, असे संघटनेचे प्रदेश अध्यक्ष कैलास पाटील यांनी कळविल्याचे ॲड. सचिन देशमुख यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपबरोबरच विविध स्थानिक आघाड्या, अपक्ष म्हणून निवडून आलेल्या सदस्यांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर नगरपंचायत, महापालिकेतही महाविकास व भाजप वगळता इतर पक्ष व आघाड्यांचे सदस्य आहेत. त्यामुळे या सर्वांची एकी झाली तर तिरंगी लढतीचे चित्र तयार होईल, असे बोलले जात आहे. पण अपक्षांना ताकद किती मिळेल व नेतृत्व कोण करणार यावर हे भवितव्य ठरेल, असे सांगण्यात आले.
प्रयोग व्हायला हरकत नाही
ॲड. सचिन देशमुख यांनी अशा प्रस्तावाबाबत माझ्याशी चर्चा केली. विधान परिषदेवर सर्वसामान्यांना संधी मिळणे अवघड असले तरी सर्वांनी जर मनात आणले तर असा वेगळा प्रयोग व्हायला हरकत नाही, अशी प्रतिक्रिया अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी व्यक्त केली.