साेलापूर : जिल्ह्यात ३० हजार काेटींची राष्ट्रीय महामार्गाची कामे मंजूर केल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना मानपत्र देण्याचा प्रस्ताव भाजप नगरसेवकांनी मांडला. जिल्ह्यात केवळ गडकरी यांच्यामुळे नव्हे तर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळेही महामार्गाचे जाळे तयार झाले असे म्हणत शिवसेना आणि काॅंग्रेसने उपसूचना मांडून प्रस्ताव मंजूर करून घेतला.
महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी सायंकाळी झाली. भाजपचे नगरसेवक सुनील कामाटी, विनायक विटकर, राजकुमार हंचाटे यांनी गडकरी यांना मानपत्र देण्याचा सभासद प्रस्ताव मांडला हाेता. केवळ गडकरी यांनाच मानपत्र का देता? जिल्ह्यामध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या माध्यमातून पुणे ते साेलापूर, साेलापूर ते हैदराबाद चाैपदरीकरणाचे काम मंजूर झाले. साेलापूर ते तुळजापूर आणि त्यापुढील रस्ताही शिंदे यांच्या काळातच झाला. त्यामुळे गडकरी आणि शिंदे यांना महापालिकेच्या वतीने एकत्रच मानपत्र दिले पाहिजे. कृतज्ञता म्हणून सत्कार केला पाहिजे, असे विराेधी पक्षनेता अमाेल शिंदे यांनी सांगितले. त्यांनी उपसूचना मांडली. काॅंग्रेस गटनेता चेतन नराेटे यांनी अनुमाेदन दिले. सूचना व उपसूचना एकमताने मंजूर झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.