सोलापूर : देशात काही शहरांचे नाव बदलण्याचे काम सध्या सुरु आहे. महाराष्ट्रातही हा प्रकार होत आहे. मीर उस्मानअली यांच्यावरुन उस्मानाबाद हे नाव पडले. उस्मानअली यांनी देशासाठी सहा टन सोने दिले, अशा व्यक्तींचे नाव का बदलले, असा सवाल करत धार्मिक तेढ वाढविण्यासाठीच नाव बदलण्याचा घाट घालण्यात आल्याचे समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी हे शनिवारी सोलापुरात होते. सोलापुरातून उस्मानाबाद येथे जाण्यापूर्वी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. देशात जे हिंदू-मुस्लीम दरी वाढत आहे. ही दरी कमी करायचे असेल तर बंधुत्व वाढायला हवे. हाच बंधुत्वाचा विचार घेऊन मी राज्याचा दौरा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
अबू आझमी म्हणाले, भाजपला रोखण्यासाठी आम्ही राज्यात महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला. पण, त्यांनी बाबरी मशीद आम्ही पाडली असे म्हणत आमच्या जुन्या जखमा उकरुन काढल्या. याची आम्हाला खंत वाटते. महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षात मौलाना आर्थिक महामंडळ, हज कमिची, उर्दू घरासाठी त्यांनी काही काम केले नाही.
स्वातंत्र्यासाठी प्रेरणा देणारी उर्दू ठरली. ही भाषा या देशातील असताना आज उर्दूला परदेशी ठरवत आहेत. मुस्लीम युवकांना बेकायदेशीरपणे जेलमध्ये टाकले आहे. जे निर्दोष असतील त्यांना सोडायला हवे, अशी भूमिका अबू आझमी यांनी मांडली.
'...तर देशाची स्थिती श्रीलंकेसारखी होईल'केंद्र सरकार हे देश विकण्याचे काम करत आहे. खासगीकरण करुन आरक्षण काढून घेत आहे. रेल्वे, विमान या सेवा काही मोजक्याच खासगी व्यावसायिकांच्या घशात घालण्यात येत आहे. आता देशावर 136 लाख कोटी कर्ज आहे. मगाहाई वाढत चालली आहे, असेच राहीले तर देश श्रीलंका सारखे बनेल, असे अबू आझमी म्हणाले.
'...मग हिजाबला विरोध का?'याचबरोबर, अभिनेता रणवीर सिंगच्या नुकत्याच करण्यात आलेल्या फोटोशूटचा उल्लेख अबू आझमी यांनी केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली न्यूड फोटोशूट खपवून घेतला जात असेल तर मग आपल्या मर्जीने परिधान केलेल्या हिजाबला विरोध का? असा सवाल समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला.