सोलापूर : रात्रीच्या वेळी मंदिरातील दानपेटी फोडून पैसे चोरी करणाºया, घरफोडी करणाºया दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. पकडण्यात आलेल्यांकडून चार गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्याकडून १२ हजार १४0 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मुकेश किसनसिंग बोधीवाले (वय २३, रा. शीतलादेवी चहा कॅन्टीनजवळ, बेडर पूल, सोलापूर), नागेश भीमप्पा शिपरी (वय २४, रा. कोंचीकोरवे गल्ली, मौलाली चौक, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शहरातील घरफोडी व मंदिराची दानपेटी फोडल्याच्या घटना घडल्या होत्या. चोरीतील संशयित हे चोरीचा माल विकण्यासाठी मौलाली चौकाकडून सिद्धार्थ चौकाकडे जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहायक पोलीस निरीक्षक अजित कुंभार, ऋषिकेश पवन व पथकांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
दोघांकडे चौकशी केली असता, पंधरा दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी मार्कंडेय नगर येथे उघड्या घरातून मोबाईल व पाण्याची मोटार चोरल्याची कबुली दिली. कुमठा नाका येथील मंदिरातील दानपेटी फोडल्याची कबुली दिली. अधिक चौकशी केली असता सोनीनगर हुडको आणि जुने होमगार्ड मैदान येथील स्काऊट गाईडच्या कार्यालयात चोरी केल्याची कबुली दिली.