वैराग : पतीच्या निधनानंतर शेजाऱ्याने वाईट हेतूने त्रास दिला. तो सहन न झाल्याने एका विधवा महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी बार्शी तालुक्यातील झाडी (बोरगाव) येथे घडली.
संगीता मोहिते असे आत्महत्या केलेल्या विधवेचे नाव असून याबाबत मृत महिलेचा मुलगा मेघराज रामचंद्र मोहिते याने फिर्याद दिली आहे. वैराग पोलिसांनी तानाजी शिवाजी मोहिते याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार झाडी (ता. बार्शी) येथील संगीता मोहिते हिच्या पतीचे अडीच वर्षापूर्वी हृद्यविकाराने निधन झाले. त्यानंतर शेजारी राहणारा तानाजी मोहिते हा तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता. त्याचा त्रास असह्य झाल्यानंतर ती मुलाला घेऊन राळेरास (ता. उत्तर सोलापूर) येथे भावाकडे राहायला गेली. मुलाच्या बारावीच्या शिक्षणासाठी सहा महिन्यांपूर्वी ती पुन्हा गावाकडे राहायला आली होती. त्यानंतर तानाजी हा पुन्हा तिला त्रास देऊ लागला. तिने तंटामुक्तीचे अध्यक्ष अमोल सांगुळे, पोलीस पाटील दयानंद मते यांना भेटून याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर त्या दोघांनी तानाजी मोहिते यास समजावून सांगितले होते. काही दिवस हा त्रास बंद झाला होता. परंतु तानाजी पुन्हा त्रास देऊ लागला. नेहमीप्रमाणे रविवारी रात्रीच्या सुमारास ती घरासमोर भांडी धूत असताना तो आला आणि त्याने अंगचटीला जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी ती ओरडली आणि मुलगा मेघराज घरातून बाहेर आला. यावरून दोघांमध्ये शिवीगाळ आणि मारहाण झाली. त्याने मेघराजला जिवे मारण्याची धमकी दिली. याचा संगीतास मनस्ताप झाला. मुलाच्या जिवाला धोका असल्याने ती तणावाखाली होती. त्रास सहन करण्यापेक्षा जीव दिलेला बरा, असे तिने बोलून दाखविले होते. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड करत आहेत.