सोलापूर : माझी पत्नी हॉस्पीटलमध्ये कामाला आहे, माझ्या पत्नीला गाडी येत नाही, शिवाय रिक्षा, बस सेवाही सुरू नाहीत, त्यामुळे मला माझ्या पत्नीला सोडण्यासाठी दुचाकीवरून दररोज जावे लागत आहे, मात्र सात रस्ता परिसरात डबलसीट वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत आहे, तरी मला माझ्या पत्नीला हॉस्पीटलला सोडण्यासाठी डबलसीटची परवानगी द्यावी असा विनंती अर्ज एका दुचाकीस्वाराने पोलीस आयुक्तांकडे केला आहे़ मात्र पोलिसांनी तो अर्ज स्वीकारला नसून आॅनलाइन अर्ज करण्यास सांगितले.
सध्या लॉकडाऊन असल्यामुळे सोलापूर शहरात दुचाकीवर डबलसीट जाण्यास सोलापूर शहर पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे शहरात डबलसीट फिरणाºयांवर दररोज शहरातील विविध भागात कारवाईचे सत्र सुरूच आहे़ अशातच बसवराज धोंडाप्पा मुस्के (रा़ आशिर्वाद नगर, जुळे सोलापूर) याची पत्नी उमादेवी बसवराज मुस्के या अश्विनी रूग्णालयात नर्स म्हणून कार्यरत आहेत. उमादेवी याना दुचाकी येत नाही, शिवाय शहरातील बस सेवा बंद आहे़ रिक्षा ने रूग्णालयापर्यंत सोडण्यासाठी २०० ते ३०० रूपये मागितले जात आहे़ त्यामुळे पती बसवराज हे दररोज पत्नीला सोडण्यासाठी दुचाकीवरून सातरस्ता मार्गे अश्विनी रूग्णालयास सोडण्यास जातात, मात्र डबलसीटला परवानगी नसल्याने वाहतुक शाखेने त्याना दोन ते तीन वेळा दंड केला़ माझी पत्नी हॉस्पीटलमध्ये कामास आहे, आयकार्ड पहा़़़अशी सातत्याने विनंती करूनही वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांनी त्यांना दंड केल्याशिवाय सोडले नाही़ त्यानंतर संतप्त झालेल्या पतीने आपल्या पत्नीला हॉस्पीटलला सोडण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी पोलीस आयुक्तांच्या नावाने लेखी अर्ज केला, मात्र पोलिसांनी तो अर्ज न स्वीकारताच आॅनलाइन अर्ज करण्यास सांगितले.
सोलापूर शहरात हॉस्पीटलला सोडण्यासाठी, दवाखान्यात दाखविण्यासाठी अनेक दुचाकीस्वार आपल्या आई, पत्नी, बहिणीला घेऊन डबलसीट जात असतात, मात्र कोणत्या कारणासाठी डबलसीट जात आहोत त्याबाबत पुरावे दाखविण्यात आले तरीही वाहतूक शाखेकडून दंड आकारला जात असल्याचे सर्रास पहावयास मिळत आहे़ सोलापूर शहर पोलीस आयुक्तांनी महत्वाच्या कामासाठी जाणाºया दुचाकीस्वारांना डबलसीटची परवानगी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.