बार्शी : बार्शीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आता फ्रन्टलाइनला काम करणारे कर्मचारीही या कोरोनापासून बाधित होत आहेत. बार्शी पोलीस ठाण्यातील एक पोलीस नाईक कर्मचारी कोरोना बाधित झाला असून, त्याची पत्नीही बाधित झाल्याचा अहवाल आला आहे. जनतेच्या सुरक्षेची काळजी घेत असताना, त्यांना मास्क, सॅनिटायझर, हँड ग्लोज अशा साधनांचाही पुरवठा नाही, तसेच या काळात हजेरीसाठी गर्दी होत असून, ऑनलाइन हजेरी घेण्याची मागणी पोलिसातून होत आहे.
बार्शीकरांच्या सुरक्षेसाठी हे पोलीस दिवस-रात्र मेहनत घेत असताना, बाधित होण्यामुळे पोलिसांमध्येही काही अंशी घबराट पसरली आहे. कोरोनाच्या काळात दिवसभर ड्युटी केल्यानंतर रात्रीच्या वेळी शहर पोलिसात घेण्यात येणाऱ्या हजेरीच्या वेळी ५० ते ८० पोलीस एकाच वेळी हजर असतात. त्यासाठी जागाही अपुरी असल्याने दाटीवाटीने उभा राहावे लागते. त्यासाठी प्रत्यक्ष हजेरी घेण्याऐवजी ऑनलाइन पद्धतीने घेतली, तर इतर पोलिसांपासून होणारा कोरोना कमी होईल, त्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी निर्णय घेणे गरजेचे आहे.
---
सुरक्षेची जबाबदारी वाढली
यापूर्वी काही पोलीस कर्मचारी व अधिकारी बाधित झाले होते. त्यापैकी बहुतांश बरे झाले आहेत. हा प्रादुर्भाव आता अधिक प्रभावी असल्याचे सांगण्यात येत आहे. बार्शीत सध्या दहा दिवसांचा लॉकडाऊन कडकडीत पाळला जात आहे. त्यामुळे पोलिसांची जबाबदारी अधिक वाढली आहे. बार्शी शहरांत चौका-चौकात थांबून बार्शी पोलीस कर्तव्य बजावत आहेत. पोलिसांना कोरोना होऊ नये, यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना अपुऱ्या पडत आहेत. या पोलिसांना शासनामार्फत मास्क, सॅनिटायझर किंवा इतर तत्सम मदत मिळत नाही.