सोलापूर: शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील केगावचा परिसर.. रंगपंचमीचा दिवस.. नेचर कॉन्झर्व्हेशन परिवाराच्या मोबाईलवर रिंग खणखणली.. पाच दिवसांपासून विहिरीत घोणस नावाचा साप पडलाय.. येता का? कोणताही विचार न करता टीम जमवली अन् ७० फूट खोल विहिरीत स्वत:चा जीव धोक्यात घालून या सापाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं. अशाप्रकारे पर्यावरणाशी नाते सांगणाºया या मंडळींनी रंगपंचमी साजरी केली.
रविवारी रात्रीच्या वेळी नेचर कॉन्झर्व्हेशनचे कार्यकर्ते संतोष धाकपाडे यांना कानिफ दळवी नावाच्या शेतकºयाचा फोन आला. केगाव येथील बिगसी कॉलेजजवळील आपल्या शेतातल्या विहिरीत साप पडला आहे. सोमवारी सकाळी नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलचे अध्यक्ष भरत छेडा, पप्पू जमादार यांच्यासह पथक १०.३० वाजता पोहचले. विहिरीची पाहणी केली. तब्बल ६० ते ७० फूट खोल विहीर. आत उतरण्यासाठी पायºयाही नव्हत्या.
आत एका कपारीत घोणस नावाचा साप अडकलेला होता. त्याचे सबंध शरीर पाण्यात होते. थोडाफार तोंडाचा भाग काय तो उघडा होता. पाच दिवसांपासून हा साप विहिरीत असल्याची माहिती शेतकरी कानिफ दळवी यांनी दिली.
साधारण ११ च्या सुमारास नेचर सर्कलच्या टीमने काही फांद्यांचा वापर करून एक मोळी तयार करण्यात आली. विहिरीवर दोन टोकाकडे दोन दोºयांच्या साह्याने सापाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न चालवले. दोरीचे एक टोक भरत छेडा यांच्याकडे तर दुसरे संतोष धाकपाडे यांच्याकडे. एका दोरीमध्ये फांद्यानी तयार केलेली दोरी अडकवण्यात आली. दोन तास हा प्रयत्न सुरू, पण वारंवार दोरीमध्ये अडकवलेली मोळी निसटून खाली पडायची. रणरणत्या उन्हामध्ये हा सारा प्रकार सुरू होता.
हा प्रयत्न यशस्वी होत नसल्याचे पाहून व्यूहरचना बदलली. शेवटी हार्नेस व दोरीच्या साह्याने पप्पू जमादार व आदित्य घाडगे कसेबसे विहिरीत उतरले. दोघांनी अर्धा तास प्रयत्न केल्यावर त्या विषारी सापाला विहिरीतल्या पाईपच्या साह्याने बंदिस्त करुन अलगदपणे बाहेर काढले. पाच दिवस साप विहिरीत असल्याने निपचित पडून होता. काही वेळानंतर त्याची हालचाल सुरू झाल्यानंतर जवळच काही अंतरावर त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
साडेतीन तासांच्या प्रयत्नाने यश- एकीकडे रंगपंचमीच्या उत्सवात रंगलेले सोलापूरकर आणि दुसरीकडे नेचर कॉन्झर्व्हेशनच्या टीम निसर्गासमवेत रंगपंचमी साजरी करून सापाची मरणाच्या दाढेतून सुटका केली. सकाळी ११ ते दुपारी २३० पर्यंत हा थरार सुरु होता. आणि तो एकदाचा यशस्वी झाल्याच्या भावना पप्पू जमादार, संतोष धाकपाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.