कुर्डूवाडी : ऐन उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. याचा सर्वाधिक त्रास हा माणसांंपेक्षाही मुक्या पशुपक्ष्यांना व वन्यजीवांना होत आहे. त्यामुळे या काळात त्यांंना खाद्यान्न बरोबरच पिण्याच्या पाण्याची सोय करणे आवश्यक आहे. याची जाणीव वनपरिक्षेत्र कार्यालयाला यंदा लवकर झाल्याने माढा तालुक्यातील अनेक गावच्या जंगलातील पाणवठ्यांमध्ये सध्या त्यांच्या वन कर्मचाऱ्यांकडून पाणी सोडण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, जंगलात हिरवा चारा उन्हाळ्यात उपलब्ध नसल्याने त्यातील काही वन्यप्राणी हे मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसून येत आहेत.
माढा तालुक्यात भुताष्टे,भेंड,पडसाळी,उपळाई(बू), बादलेवाडी, तुळशी, दहिवली, उपळवाटे, परिते, पडसाळी, बावी, वडाचीवाडी यासह अनेक गावांमध्ये वनपरिक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. या वनपरिक्षेत्रांमध्ये हरीण, काळवीट,ससा, मुंगूस यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तर कोल्हा, लांडगा, खोकड, मोर, माळटिटवी, टिटवी असे विविध प्रकारचे प्राणी व पक्षी यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने या पशुपक्ष्यांना तसेच वन्यजीवांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. तसेच हिरवा चारा देखील उपलब्ध होत नसल्याने हे मानवी वस्तीमध्ये येतात.
--
१२ हजार लिटर पाणीसाठा उपलब्ध
वन्य जीवांना तसेच पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून दर पंधरा दिवसाला सुमारे १२ हजार लिटर पाणी तालुक्यातील विविध ठिकाणच्या जंगलात तयार करण्यात आलेल्या सुमारे १९ पाणवठ्यांमध्ये वनविभागाच्यावतीने सोडण्यात येत आहे. आता सामाजिक संघटनांनी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन या वन्य जीवांसाठी पाणवठ्याच्या ठिकाणी त्यांंना खाण्यासाठी हिरवा चारा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
....................
०६ कुर्डुवाडी
दहिवली येथे वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालयाकडून जंगलातील पाणवठ्यात पाणी सोडताना वन विभागाचे कर्मचारी