काशिनाथ वाघामारे
सोलापूर : अनेक वर्षे शैक्षणिक सेवेतून सरस्वतीची पूजा करणाºया वन्यजीवमातेने यंदा उन्हाळ्यात पशुपक्ष्यांसाठी माळरानावर पाणवठे तयार केले आहेत. तसेच या माळरानावर चिवचिवाट बहरावा म्हणून वर्षभरात हजार वृक्ष लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. बस्स ! गरज आहे...सर्वसामान्यांच्या योगदानाची.
अपर्णा बिराप्पा शेजाळ असे त्या वन्यजीव मातेचे नाव. दक्षिण सोलापूर तालुक्यात कंदलगाव परिसरात ओसाड माळरानावर खासगी शाळा आणि महाविद्यालय उभारत असताना स्वत: परिश्रमातून असंख्य झाडी फुलवली़ येथून कोणी जात असेल तर हिरवळ आणि झाडी पाहून थोडा विसावा घेतो. जशी मुलांची शाळा फुलवली तशी चिमण्यांची आणि अन्य पशुपक्ष्यांची शाळा भरवण्याचे स्वप्न बाळगून या परिसरात चिमण्यांसाठी घरटी लटकावताहेत. पशु-पक्ष्यांबद्दल प्रेम वाढावे, मानवता निर्माण व्हावी यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना दिवसभरातील काही वेळ याचे धडे त्या देतात तसेच शाकाहाराचे महत्त्वही त्या विद्यार्थ्यांना पटवून सांगतात.
इतकेच नव्हे तर स्वत:च्या घराभोवतीही पक्ष्यांसाठी पाण्याच्या लोटकी आणि खाद्यासाठी भांडी लावली आहेत. घरातून शाळेला निघताना त्या पिशवीत काही प्रमाणात धान्य घेऊन निघतात आणि गावच्या माळरानावर पशुपक्ष्यांना घालतात़ हाच प्रयोग त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनही करत आहेत़ आज त्यांच्या शिकवणीनुसार बहुतांश विद्यार्थी घरातून निघताना बाटलीभर पाणी आणतात आणि माळरानावर वाळणाºया झाडाला ते घालतात.
पर्यावरण आणि वन्यजीवाचा हा लळा त्यांना वडील मेजर शंकरराव खांडेकर आणि आई सिंधूताई खांडेकर यांच्याकडून लागला़ त्यांच्या या माणुसकीच्या कार्यात पती प्रा़ बिराप्पा शेजाळ हेदेखील सहभागी होतात़
शिकाºयाच्या तावडीतून हरणाची सुटका दक्षिण सोलापूर परिसरात हरणांचे प्रमाण आहे़ उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात हे वन्यजीव विहिरीपर्यंत जातात़ मागे दोन वर्षांपूर्वी असेच एक हरीण कंदलगाव परिसरात कोरड्या विहिरीत कोसळले़ या परिसरातील काही शिकारी लोक त्याला विहिरीतून बाहेर काढून लपवत घेऊन निघाले होते़ शाळेतून बाहेर पडलेल्या शेजाळ यांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर त्यांना पोलिसांची आणि वनकायद्याची भीती घालून शिकाºयाच्या तावडीतून मुक्या जीवाची सुटका केली़ जखमी हरणावर उपचार करुन वनविभागाकडे त्याला सोपवले़ या आठवणीने त्यांच्या मुक्याजीवांविषयी असलेले प्रेम आणखी गडद करते.
भारतीय पक्ष्यांचे एक वैशिष्ट्य आहे की, ते घरटी केवळ भारतीय वृक्षावरच करतात़ सध्या महाराष्ट्रासह सोलापुरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा आणि स्मार्ट सिटीत व्हीआयपी रोडवर परदेशी झाडं यापूर्वीच लावली गेली आहेत. या झाडावर एक पक्षीही बसत नाही, ना वास्तव्य करते़ त्यांच्या गरजा ओळखून कंदलगाव परिसरात रस्त्याच्या दुतर्फा हजार झाडी लावत आहोत़ त्यांच्यासाठी कृ त्रिम घरटी बसवत आहोत़ खाद्यही पुरवत आहोत़- अपर्णा शेजाळ, वन्यजीव माता