Madha Lok Sabha ( Marathi News ) : माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात गेल्या अनेक दिवसांपासून विचारमंथन सुरू आहे. आधी रासपच्या महादेव जानकर यांना थेट ऑफर देऊनही ते महायुतीसोबत गेल्याने शरद पवारांची नाचक्की झाली. त्यानंतर आता मोहिते पाटील कुटुंबालाही पक्षांतरापासून रोखण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भाजपने पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले मोहिते पाटील कुटुंब निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून प्रचाराला सुरुवात केली आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. ते तुतारी हाती घेण्याची शक्यता असून धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी याबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र असं असलं तरी मोहिते पाटील कुटुंबाची नाराजी दूर करून त्यांच्यासोबत पॅचअप करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा पंढरपूरमधील भाजप नेते प्रशांत परिचारक यांनी केला आहे.
धैर्यशील मोहिते पाटील यांचे वडील जयसिंह मोहिते पाटील यांनी आम्ही तुतारी हाती घेणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच केली आहे. मात्र अद्याप मोहिते पाटील कुटुंबीयांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झालेला नाही. मोहिते पाटील कुटुंब भाजपपासून दूर गेल्यास पक्षाला माढा मतदारसंघात मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून विविध नेते मोहिते पाटलांशी संवाद साधत आहेत. याबाबतच आज प्रशांत परिचारक यांनी गौप्यस्फोट केला.
"मोहिते पाटील कुटुंबासोबत आमचे मागील ४० वर्षांपासून कौटुंबिक संबंध आहेत. प्रसारमाध्यमे म्हणत असली तरी अजून मोहिते पाटलांनी अधिकृतपणे तुतारी हातात घेतलेली नाही. आमचे विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि मोहिते कुटुंबासोबत अजूनही पॅचअपचे प्रयत्न सुरू आहेत. मागच्या निवडणुकीत निंबाळकर हे नवखे उमेदवार होते, पण आता पाच वर्षात त्यांनी भरपूर काम करून नवनवीन कार्यकर्ते जोडले आहेत. त्यामुळे माढा लोकसभा भाजप मोठ्या मताधिक्याने जिंकेल. मात्र नवीन माणसे जवळ येताना एकही जुना नेता अथवा कार्यकर्ता दूर जाऊ नये, असा आमचा प्रयत्न आहे," असं प्रशांत परिचारक यांनी सांगितलं आहे.
शरद पवारांच्या गोटात नेमक्या काय हालचाली सुरू?
माढा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देऊन आघाडी घेतली. पण, घरातूनच उमेदवारीला विरोध झालाय. भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते-पाटील वेगळ्या वाटेवर जाण्याची चिन्हे आहेत. त्यातच महायुतीतीलच रामराजे नाईक-निंबाळकर हेही मोहिते यांच्याबरोबर आहेत. यामुळे माढ्यात वेगळंच राजकारण रंगू लागले आहे. या घडामोडीकडे शरद पवार हेही लक्ष ठेवून आहेत. त्यांनाही मतदारसंघात तगड्या उमेदवाराची गरज आहे. असा उमेदवार अकलूजच्या मोहिते-पाटील किंवा फलटणच्या रामराजे यांच्या घरातूनच मिळू शकतो, हेही स्पष्ट आहे. त्यामुळे पवार हे अशा उमदेवारासाठी गळ टाकून आहेत. गळ लागला तर ठीक नाहीतर दुसरे पर्यायही त्यांनी समोर ठेवल्याची माहिती मिळत आहे. अशा कारणातूनच अजूनही पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित झालेला नाही.