सोलापूर : जनावरांची अवैध वाहतूक करणारी आणि सर्व प्रकारच्या गुन्ह्यामध्ये जप्त असलेली वाहने न्यायालयाच्या परवानगीशिवाय सोडू नये. दाेन किंवा दाेनपेक्षा जास्त गुन्ह्यामध्ये वापरात आलेल्या वाहनांचा परवाना रद्द करण्याचे प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात यावेत, असे आदेश पाेलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी बुधवारी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले.
साेलापुरातील गाेवंश आणि इतर जनावरांच्या अवैध वाहतुकीचे प्रकार वाढले आहेत. प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या सदस्यांनी बुधवारी उपायुक्त कबाडे यांची भेट घेतली. जिल्ह्यात ठराविक वाहनांमधून गाेवंश वाहतूक हाेत असल्याचे निदर्शनास आले आहे. पाेलिस ही वाहने पकडतात. वाहन चालकांवर दंड करतात आणि शपथपत्र घेउन वाहने साेडून देतात. या शपथपत्राचा वारंवार भंग हाेत आहे. पाेलिस अधिकारी गुन्ह्यात सापडलेल्या वस्तू न्यायालयाचा निकाल येईपर्यंत परत देत नाही. अशाच पध्दतीची कारवाई जप्त वाहनांवर करावी अशी मागणी समितीचे सदस्य केतन शहा यांनी केली.
पाेलिस उपायुक्त कबाडे यांनी सर्व पाेलिस ठाण्यांच्या प्रमुखांना तातडीने एक पत्र पाठवले. अवैध प्राणी वाहतुकीसाठी आणि गाेवंश मांस वाहतुकीसाठी सर्रासपणे वाहनांचा वापर केला जात आहे. या वाहनांवर महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमानुसार गुन्हे दाखल करा. ही जप्त करुन ठेवा. जप्त केलेल वाहन यापूर्वीच्या गुन्ह्यात वापरले गेले आहे की नाही याची शहानिशा करा. यापुढील काळात सर्व प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली वाहने न्यायालयाच्या परवानगीशिवाय साेडू नका. एकच वाहन दाेन किंवा दाेनपेक्षा जास्त गुन्ह्यामध्ये वापरले जात असेल तर त्या वाहनाचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव तयार करा. हा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पाठवा, असे उपायुक्तांनी म्हटले आहे.