सोलापूर : नागरिकांनो पोलिसांना घाबरू नका...आपल्या तक्रारी, अडीअडचणी प्रामाणिकपणे पोलिसांना सांगा...समन्वय ठेवा...नागरिक अन् पोलिसांमध्ये समन्वय वाढविण्याबरोबरच पोलिसांबद्दल समाजात असलेली भिती दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत सोलापूर शहर पोलिस दलातील नूतन पोलीस आयुक्त हरिश बैजल यांनी व्यक्त केले.
सोलापूरचे नवे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. तत्पुर्वी त्यांनी पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्ष व इतर विभागाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. प्रारंभी आजपर्यंतच्या पोलिस दलातील कारकिर्दीविषयी त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की, आजचा माझा पहिलाच दिवस आहे. त्यामुळे सर्व विभागांची माहिती घेऊन पुढे काय करायचे त्याबाबत ठरविणार आहे. पोलीस आणि नागरिकांमध्ये समन्वय आवश्यक आहे, जनतेने पोलीसांना घाबरू नये, समन्वय ठेवावा असे सांगितले. असे सांगतानाच सायबर क्राईम बाबत बोलताना त्यांनी नागरिकांनी आमिषाला बळी पडू नये, चूका या आपण स्वतः करतो त्या होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, ऑनलाइन फसवणूक गुन्ह्यांना आवर घालता येईल. शहरातील वाहतुकीला शिस्त लावणार मात्र नागरिकांचे प्रबोधन करून. त्यासाठी शाळांचा उपयोग करून घेणार अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी पोलीस उपायुक्त दीपाली घाटे, उपायुक्त वैशाली कडुकर, उपायुक्त बापू बांगर आदी पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.