सोलापूर : गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणासाठी संघर्ष करत आहे. त्यासाठी ५८ मोर्चे काढण्यात आले. याचे फलित समाजाला मिळाले होते. आमच्या सरकारने मागासवर्गीय आयोग स्थापन करून आरक्षण दिले. उच्च न्यायालयानेही ते मान्य केले. मात्र सुप्रिम कोर्टात बाजू मांडण्यात आपण कमी पडलो असे वाटत आहे. मराठा समाजाबरोबर आपण कायम उभे राहणार आहोत. आरक्षणासाठी कोणताही त्याग करण्यासाठी आपण तयार आहोत. वेळप्रसंगी पदाचा राजीनामाही देऊ, असे आश्वासन आ. सुभाष देशमुख यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सकल मराठा, मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाºयांनी होटगी रोड येथील आ. सुभाष देशमुख यांच्या निवासाबाहेर आसूड आंदोलन केले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांशी आ. देशमुख बोलत होते. मराठा आरक्षणासाठी आता सर्व पक्षांनी एकत्र येऊन सुप्रिम कोटार्ला विनंती करावी लागणार आहे. त्यासाठी जे करावे लागेल ती करण्याची आपली तयारी आहे. तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, एकत्र येऊन लढले पाहिजे, अशी समाजाची भावना आहे.
माझ्या राजीनाम्याने जर आरक्षण मिळत असेत तर आपण एका पायावर राजीनामा देण्यास तयार आहोत. आपण लोकप्रतिनिधी आहोत. समाजाच्या भावनांचे, दुखाचे जर निवारण करता येत नसेल तर पदावर राहण्यात अर्थ नाही, त्यासाठी आपण कोणताही त्याग करू, असेही देशमुख म्हणाले. मराठा आरक्षणावर कोणाकडूनही राजकारण होत नाही. राज्य सरकार आपली जबाबदारी पार पाडत आहे, केंद्राकडूनही प्रयत्न होतील. कोणताही पक्ष मराठा समाजाच्या आरक्षणला विरोध करेल, असे वाटत नाही, असेही देशमुख म्हणाले.