सांगोला : शिवसेनेत प्रवेश करताना विधानसभेच्या उमेदवारीची अपेक्षा न बाळगता तालुक्याच्या विकासाची दूरदृष्टी ठेवून आपण प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्याच्या जनतेचा पाणीप्रश्न सेना-भाजप महायुतीच प्राधान्याने सोडवेल, असा माझा विश्वास आहे. येत्या शुक्रवारी २० जून रोजी आपण शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार असल्याचे माजी आ. अॅड. शहाजीबापू पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.अॅड. शहाजीबापू पाटील यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, जिल्हा उपप्रमुख सूर्यकांत घाडगे, पंढरपूर तालुकाप्रमुख संभाजी शिंदे, सांगोला शहरप्रमुख कमरूद्दीन खतीब, तालुकाप्रमुख मधुकर बनसोडे या पदाधिकारी, शिवसैनिकांनी ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी व सत्कार करून स्वागत केले. शनिवारी दुपारी अॅड. शहाजीबापू पाटील यांनी त्यांच्या सांगोल्यातील निवासस्थानी तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पक्षप्रवेशाबाबत सविस्तर चर्चा केली. सांगोला तालुक्याच्या दुष्काळी जनतेचे रखडलेला पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी १९९९ ते २०१४ पर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँगे्रस व शेकाप हे तिन्ही पक्ष सत्तेत असताना व माढा मतदारसंघाचे तत्कालीन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार नेतृत्व करीत असताना या योजनेची कामे पूर्ण होऊ शकलेली नाहीत. सांगोला तालुका पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून सन १९९४ साली कृष्णेचे पाणी शेतीला व भीमेचे पाणी पिण्यासाठी सर्व गावांना मिळावे ही संकल्पना मी मांडली होती. टेंभू - म्हैसाळ योजना, उजनीचे उचल पाणी नीरा- उजवा कालव्यात टाकणे हे मुद्दे घेऊन जनतेसमोर मांडले होते. त्यावेळी तालुक्यातील ज्येष्ठ मंडळी व इतर नेत्यांनी मला हसून लबाड ठरवित होते, मात्र तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न खऱ्या अर्थाने सेना-भाजप सरकारने उचलला. त्यांचे सरकार पायउतार झाल्यानंतर गेल्या १५ वर्षांत तालुक्याच्या शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटू शकला नाही, असे अॅड. शहाजीबापू पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ---------------------------ज्यांना विचारधारा आवडेल त्या सर्वांना सोबत घेऊन पक्ष प्रवेश करणार असल्याचे सांगून जे येणार नाहीत त्यांना आग्रह करणार नाही. शिवसेनेतील सर्व पदाधिकारी शिवसैनिकांचा सन्मान राखून त्यांच्या आदेशानुसार काम करू.- अॅड. शहाजीबापू पाटीलमाजी आमदार
महायुतीच्या माध्यमातून प्रश्न सोडविणार
By admin | Published: June 15, 2014 12:40 AM