सोलापूर : अकलूज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत खासदार विजयसिंह मोहिते पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. मोदींच्या हस्ते त्यांचा सत्कारही झाला, याविषयी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले, ‘पंचाहत्तरीनिमित्त सत्कार करण्यात आल्याचे मोहिते पाटील सांगू शकतात; पण माढा मतदारसंघात विरोधी उमेदवाराचा ते उघडपणे प्रचार करत आहेत. हा पक्षशिस्तीचा भंग आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत त्यांच्यावर कारवाईबाबत पक्ष निर्णय घेईल.’
काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी ‘लोकमत’ च्या प्रतिनिधीशी संवाद साधला. यावेळी खासदार हुसेन दलवाई, आमदार शरद रणपिसे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारामधे विकासाचा मुद्दा सोडून राष्ट्रवाद, पाकिस्तान हे मुद्दे आणले आहेत. त्याआडून ते पाकिस्तान नव्हे, तर देशातील मुस्लिम समाजाला लक्ष्य करीत आहेत, अशी टीका खासदार हुसेन दलवाई यांनी मोदींवर केली. या देशात त्यांच्याशिवाय देशभक्त कुणीच नाही असे त्यांना वाटत आहे, असा टोलाही हुसेन दलवाई यांनी लगावला.
दलवाई म्हणाले की, राष्ट्रवाद हा त्यांचा मुद्दा असूच शकत नाही. हे सरकार केवळ भांडवलदारांसाठी राबलेले आहे. या भांडवलदारांची पाकिस्तानमध्ये गुंतवणूक आहे. मोदींना त्यांची काळजी जास्त आहे. म्हणून पाकिस्तानच्या पंतप्रधानांना ते प्रेमपत्र पाठवतात. भारतात पुन्हा मोदी सरकार आले तर शांतता प्रस्थापित करण्यास मदत होइल, असे इम्रान खान बोलतात. यावरून मोदींची पाकिस्तान विषयीची भूमिका स्पष्ट होते.
गोहत्या, झुंडशाहीचे मुद्दे उपस्थित करून मुस्लिमांना लक्ष्य केले जात आहे. बहुसंख्याकाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे मुस्लिम समाज भाजपला कधीच मतदान करणार नाही, असे दलवाई म्हणाले.
पुनर्विकासाची नियमावली कधी ?सत्तेत नसताना पालकमंत्री गिरीश बापट म्हाडाच्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी सातत्याने टीका करत होते; पण मागील साडेचार वर्षांत त्यांची सत्ता असताना अद्यापही ही पुनर्विकासाची नियमावली तयार झाली नाही. त्यामुळे या वसाहतींचा पुनर्विकास ठप्प झाला आहे. याबाबत त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे ही नियमावली कधी तयार होणार, असा सवाल काकडे यांनी उपस्थित केला.