सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या अंदाजपत्रकात २४८ कोटी ४३ लाख ३६ हजार रुपये इतकी अपेक्षित रक्कम जमा गृहीत धरून २९८ कोटी २४ लाख ८६ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास अधिसभेने एकमताने दुरुस्तीसह मंजुरी दिली. या अंदाजपत्रकात ४९ कोटी ८१ लाख ५० हजार रुपये इतकी तूट दर्शविण्यात आली आहे. विद्यार्थी विकास आणि संशोधनासाठी या अंदाजपत्रकात भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे.
बुधवारी, विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक पार पडली. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा यांच्यासह अधिसभेचे सदस्य उपस्थित होते. या सभेचे सचिव म्हणून कुलसचिव योगिनी घारे यांनी काम पाहिले. या बैठकीत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. सचिन गायकवाड यांनी अंदाजपत्रक सादर केले.
विद्यापीठाच्या या अंदाजपत्रकाची प्रामुख्याने पाच टप्प्यांमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. देखभाल दुरुस्ती, वेतन, ऋण आणि अनामत, विकास योजना भाग एक- शासन अनुदान तसेच विकास योजना भाग दोन- विद्यापीठ निधी अशा पाच टप्प्यांमध्ये अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यंदाच्या अंदाजपत्रकात विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तसेच संशोधन कार्य, विविध उपक्रम राबविण्यासाठी निधीची भरीव तरतूद करण्यात आली आहे. अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर अधिसभा सदस्यांनी चर्चा करून दुरुस्तीसह अंदाजपत्रकाला एकमतानी मंजुरी दिली. अधिसभेच्या बैठकीत सुरुवातीला मागील इतीवृत्तांत वाचून कायम करण्यात आला. त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास पार पडला. अंदाजपत्रकाच्या सादरीकरणानंतर सदस्यांनी काही ठराव मांडले. ठरावावर चर्चा करुन निर्णय घेण्यात आले.