शहाजी फुरडे-पाटील
बार्शी : मळेगाव येथील बजरंग श्रीपती मुंढे नागालँड सीमेवर इंटेलिजन्स कोअर (नायक) म्हणून सेवा बजावत असताना शहीद झाले. लग्नानंतर अवघ्या चार वर्षांतच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. वडील शहीद होताना एक मुलगा दोन वर्षांचा आणि दुसरा महिन्यांचा होता. या परिस्थितीमधून सावरण्यासाठी काही वर्षे लोटली. सासू-सासºयांनी आधार दिला. खचून न जाता मुलांना शिकवल़े आज दोन्ही मुले स्वत:च्या पायावर उभारली अन् पतीचे स्वप्न पूर्ण झाल्याची कृतार्थ भावना वीरपत्नी निर्मलाबाई मुंढे यांनी व्यक्त केली.
ही संघर्षगाथा आहे बार्शी तालुक्यातील मळेगाच्या निर्मलाबाई मुंंढे यांची़ नारायण मुंढे, जरीचंद मुंढे, बजरंग मुंढे या तीन भावंडाचे एकत्र कुटुंब होते़ शहीद बजरंग हे सर्वात लहान. वडील श्रीपती मुंढे हे वारकरी संप्रदायातील व्यक्ती. शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन. वयाच्या १९ व्या वर्षी बजरंग सैन्यात भरती झाले. सैन्यामध्ये आठ वर्षे सेवा बजावल्यानंतर बजरंग यांचे निर्मलाबाई यांच्याशी विवाह झाला. धाडसी स्वभावामुळे बजरंग गुप्तहेर खात्यात (इंटेलिजन्स कोअर) सेवा बजावू लागले. शहीद होण्यापूर्वी एक महिना अगोदर ते मुलगा झाल्याच्या आनंदात त्याला पाहण्यासाठी आले़ त्यानंतर अचानकपणे एक दिवस ते शहीद झाल्याची तार आली. या घटनेदरम्यान मुलं छोटी असल्याने त्यांना फक्त फोटोतील पित्याचा चेहराच आठवतो.
अत्यंत तुटपुंज्या पेन्शनवर मुलांना सांभाळताना कसरत करावी लागली. काही काळ शेतीमधील कामे करावी लागली़ ही परिस्थिती चुलत सासरे कारभारी मुंढे यांना समजताच मुलांचा शैक्षणिक खर्च उचलला़ लहानपणापासूनच मुलांमध्ये शिक्षणाबरोबर संस्कार रुजवले़ कठीण परिस्थितीसमोर हार मानली नाही़ कठोर परिश्रमाचे मूल्य मुलांमध्ये रुजवले. स्वाभिमानी स्वभावाने परिस्थितीचे भांडवल करुन कधी कुणाकडे मदत मागितली नाही.
मळेगावमधील माजी सैनिक नागनाथ विटकर, बाळासाहेब माळी यांच्या पुढाकाराने लोकवर्गणीमधून गावामध्ये शहीद स्मारक उभारले आहे. छोटा मुलगा प्रमोद हा एस.आर.पी. मधील सेवेनंतर उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशनमध्ये हवालदार या पदावर दाखल झाला. मोठा मुलगा प्रवीण हा गावातील नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळात मराठी विषय शिक्षक म्हणून कार्यरत आहे.
स्वाभिमानी निर्मलाबाई सासरीच स्थिरावल्या...
- - दोन्ही मुलांचा सांभाळ करताना खूपच ओढाताण झाली़ त्यातच पतीचा पगारही थांबला़ पेन्शन अगदीच तुटपुंजी असल्याने एका वर्षातच एकत्र कुटुंबाने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
- - एका दु:खातून सावरत असताना पुन्हा एक मानसिक धक्का बसला. त्यावेळी माहेरच्या लोकांनी तिला माहेरी स्थायिक होण्याचा सल्ला दिला. पण स्वाभिमानी स्वभावाच्या निर्मलाबार्इंना तो सल्ला आवडला नाही. त्यांनी सासरी राहण्याचा धाडसी निर्णय घेतला.
- - स्थिर स्थावरतेनंतरच दोन्ही मुलांची लग्नं लावली़ जन्मभूमी मळेगावची नाळ तुटू नये म्हणून प्रत्येक वर्षी उन्हाळा व दिवाळीच्या सुट्टीमध्ये संपूर्ण कुटुंब मळेगावी वास्तव्याला येते़