सोलापूर : इलेक्ट्रिक मोटारीच्या सहाय्यानं राहत्या घरी पाण भरुन झाल्यानंतर प्लगपिन काढताना एका तरुण महिलेला खबरदारी न घेतल्यानं उपचारापूर्वीच जीव गमवावा लागला. सोमवारी सकाळी ७:१५ च्या दरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे ही चटका लावणारी घटना घडली.
यातील मयत विवाहित महिला कंदलगाव (ता. दक्षिण सोलापूर) राहत्या घरी नळाला पाणी आल्यानं इलेक्ट्रिक मोटारीच्या सहाय्यानं सोमवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास पाणी भरत होती. पाणी भरुन झाल्यानंतर दक्षता न बाळगल्यामुळे प्लगपिन काढताना तिला जोराचा करंट लागला. आत ओला व आजूबाजूला पाणी असल्याने तिला काही कळण्याच्या अगोदरच झटका बसल्यामुळे ती बेशुद्ध पडली.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घरातील मंडळींचा एकच गोंधळ उडाला. प्रसंगावधान राखून महिलेचा दीर अक्षय शिंदे यांनी तातडीने वाहनाची सोय करुन सोलापूर गाठले. शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी तपासले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. सिव्हील पोलीस चौकीत था घटनेची नोंद झाली आहे.
इलेक्ट्रिक उपकरण हाताळताना दक्षता घ्या- इलेक्ट्रिक उपकरणं हाताळताना खबरदारी न घेतल्यामुळे जीवावर बेतू शकतं. त्यातूृन सोमवारीची घटना घडली. यासाठी सर्वप्रथम कोणतेही इलेक्ट्रिक साहित्य हातळताना वीज पुरवठा खंडित झाल्याची खात्री करुनच वायर अथवा उपकरणाला हात लावावा, असा सल्ला विद्युत क्षेत्रातील तज्ञांनी दिला आहे.