सोलापूर : घरामध्ये एकटी असल्याचे पाहून अनोळखी महिलेने घरात शिरून चेहऱ्यावर चटणी टाकून मारहाण केली. गळ्यातील दागिने काढून दे म्हणून धमकी दिल्याची फिर्याद डॉ. संगीता वसंत सोनवणे यांनी सदर बझार पोलिसांत दिल्याप्रकरणी सदर संशयित महिलेला पोलिसांनी २४ तासांत अटक केली. जिल्हा सत्र न्यायालयाने त्या महिलेला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
या प्रकरणी सदर बझारचे फौजदार नितीन शिंदे यांच्या पथकाने संशयित महिलेला अटक केली. फिर्यादी डॉ. सोनवणे यांच्या म्हणण्यानुसार ती अनोळखी महिला घराच्या उघड्या दरवाजातून अचानक आत आली. स्टडी रुममध्ये मागून डोळे बंद केले. चेहऱ्यावर चटणी टाकून दागिने देण्यासाठी शिवीगाळ व दामदाटी केल्याचे म्हटले आहे. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली, तेथे कोठेही चटणी दिसून आली नाही. तर संशयित महिलेविरुद्ध पोलिस रेकार्डवर कोणताही गुन्हा दाखल नाही. पोलिसांनी तिची चौकशी केली असता तिने 'मी शेजारील महिलेकडे काम मागायला गेले होते, त्यावेळी फिर्यादीने सदर महिलेला पाहून चोर म्हणून ओरडली. असे संशयित महिलेने पोलिसांना सांगितले आहे. या प्रकरणी पुढील तपास फौजदार नितीन शिंदे करीत आहेत.