सोलापूर : सांगोला तालुक्यातील शीरभावी येथे कुटुंबीयांवर जादुटोणा करत असल्याच्या संशयावरून, आत्याचा खून केल्याने भाच्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.
शिरभावी गावालगत असलेल्या वन विभागाच्या जागेत ५५ ते ६० वर्षीय महिलेचा दगडाने व धारदार शस्त्राने खून झाल्याचे ११ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता आढळून आले होते. अज्ञात मयत महिलेची माहिती मिळवून पोलिसांनी ओळख पटवली. मयत महिलेचे नाव व्दारका बबन माने (रा. धायटी, ता. सांगोला) असे असून ती तिच्या दोन मुला समवेत राहत असल्याचे समजले. द्वारका या ११ मार्च रोजी धायटी येथील राहत्या घरातून तिच्या त्याच परिसरात राहणाऱ्या भावाकडे गेल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी सखोल तपास केला असता, त्यांना महिलेच्या मृत्युनंतर तिच्या सख्या भावाचे व त्याच्या मुलांचे वर्तन संशयास्पद असल्याचे लक्षात आले. महिलेचा भाचा गुन्हा घडल्यापासून आपले अस्तित्व लपवून राहत असलेचे लक्षात आले. भाच्याचा शोध घेऊन चौकशी केली असता, त्याने आत्या आमच्या कुटुंबियांवर जादूटोणा करीत होती. आमची प्रगती होत नव्हती त्यामुळे दगडाने डोके ठेचून खून केल्याची कबुली भाच्याने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी भाचा विजय दत्ता खांडेकर (वय ४२ रा. शीरभावी ता. सांगोला) याला अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या पथकाने केली.