साेलापूर - घरात खायला काहीच नाही. जगणे नकाे, मेलेले बरे म्हणत एक महिला रविवारी छत्रपती संभाजी तलावाजवळ पाेहाेचली. मुलांना साेबत घेऊन तलावात उडी मारण्यासाठी ती जागा शाेधू लागली. महिला पाेलिसांचे प्रसंगावधान आणि नगरसेविकेने परिवर्तन करून दिलेला आधार यांमुळे एक कुटुंब बचावले.
निलोफर महिबूब शेख (वय ३५), सीमरन महिबूब शेख (११), रेहान महिबूब शेख (८) हे तिघेही रविवारी रविवारी छत्रपती संभाजी महाराज तलावाजवळ पाेहाेचले. महिला पाेलीस पपिपा पात्रे यांनी या महिलेला हटकले. ‘धुणी-भांडी करून घर भागवते. काेराेनाच्या लाॅकडाउनमध्ये काम केले. आता काम मिळेना. घरात खायला काहीच नाही. जगून काय करू म्हणून जीव द्यायला आले,’ असे या महिलेने सांगितले. पाेलिसांनी या महिलेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान नगरसेविका फिरदाेस पटेल यांना याबद्दल माहिती देण्यात आली. फिरदाेस पटेल व शाैकत पठाण तत्काळ या ठिकाणी आले. निलाेफर आणि त्यांच्या दाेन मुलांना त्यांनी गाडीत बसवून घरी आणले. दाेन महिने पुरेल इतके अन्नधान्य दिले. यापुढील काळात मदत करण्याचे आश्वासनही दिले. मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्याची तयारी दाखविली. त्यानंतर निलाेफर आणि दाेन मुले घरी परतली.
घराघरांत रविवारी गाैरी-गणपतीचे आगमन झाले. आम्हीही त्याच आनंदात हाेताे. या दरम्यान निलाेफर शेख आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल माहिती मिळाली. समाजातील वंचित महिलेची सेवा करण्याची संधी गाैरी-गणपतीनेच आम्हाला दिली, असे आम्ही मानताे. काेराेनामध्ये अनेकांचे नुकसान झाले. संकटावर मात करायला वेळ लागेल. मात्र कुणीही आत्महत्येचा विचार करू नये, असे आम्हाला वाटते. पाेलिसांनी दाखविलेली तत्परता महत्त्वाची हाेती.
- फिरदाेस पटेल, नगरसेविका