सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील वर्षभरात १३३ महिला व मुलींवर अत्याचार झाले. असुरक्षितेतची भावना त्यांच्यात निर्माण झाली असून, पोलिसांनी कडक पावले उचलावीत, असा सूरही त्यांच्यातून निघत आहे.
नॅशनल क्राइम रेकॉर्डस् ब्युरोच्या अहवालानुसार मागील वर्षी महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये २१ टक्क्यांनी घट झाल्याचे सांगण्यात आले आहे. यासोबत या रिपोर्टमध्ये अपहरणाच्या ६४ घटना शहरात, जिल्ह्यामध्ये १३६ घटना घडल्याची नोंद आहे. सोबतच मागील वर्षी जिल्ह्यात एकूण ७४ अत्याचाराच्या घटना आणि शहरात १९ घटना घडल्याची नोंद आहे; पण चालू वर्षामध्ये जिल्ह्यात ऑगस्टअखेरीपर्यंत एकूण १३३ अत्याचाराच्या घटनांमध्ये सामूहिक अत्याचाराच्या पाच घटना आणि या १८ वर्षांवरील महिलांवर अत्याचाराच्या ५४ घटना घडल्या आहेत.
अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या ७४ घटना
नॅशनल क्राइम रेकॉर्डस् ब्युरोच्या अहवालानुसार सोलापूर जिल्ह्यात मागील वर्षी १६२ अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनांच्या नोंदी झाल्या आहेत, तर यंदा ऑगस्ट महिन्यापर्यंत ७४ घटना घडल्या आहेत. ही आकडेवारी पाहता अत्याचाराच्या घटनांमध्ये घट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
महिलाविषयक कायद्यांविषयी जनजागृती
अत्याचाराच्या घटना जरी जास्त असल्या तरी पोलिसांचा योग्य कारवाईमुळे जवळपास ९५ टक्के आरोपी हे गजाआड झालेले आहेत. अशा घटना होऊ नयेत यासाठी पोलीस प्रशासनाकडून निर्भया, दामिनी अशा पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांच्या माध्यमातून एकांत असलेल्या ठिकाणी पोलिसांकडून वेळोवेळी गस्त घातली जाते, तसेच शाळा महाविद्यालये परिसरात महिलाविषयक कायद्यांविषयी जनजागृती केली जाते.
८० टक्के अपहरण झालेल्या मुलांचा शोध
मागील तीन वर्षांत अपहरणाचे गुन्हेही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यात २०१८ मध्ये २२६, २०१९ मध्ये २४७, २०२० मध्ये १९५ गुन्हे तर २०२१ मेअखेरीपर्यंत ८० मुलांच्या अपहरणाचे गुन्हे दाखल झाले होते. यातील जवळपास ८० टक्के मुलांचा शोध लागलेला आहे, तर उर्वरित मुलांचे शोध कार्य अजूनही सुरू आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.