महिलांनी ठरवलंय भाजप, शिंदे सरकारचा पराभव करायचा; प्रदेश महिला काँग्रेस आक्रमक
By Appasaheb.patil | Published: March 9, 2023 07:43 PM2023-03-09T19:43:58+5:302023-03-09T19:44:33+5:30
काँग्रेस भवन येथे सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसची आढावा बैठक झाली.
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : भाजप सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार, महागाई अन् बेरोजगारी वाढली आहे. २०२४ च्या निवडणुकीत महागाई, बेरोजगारी वाढविणाऱ्या भाजपा आणि शिंदे सरकारचा पराभव करायचा असं महिलांनी ठरवलं असं वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी केला आहे.
काँग्रेस भवन येथे सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसची आढावा बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महिला अध्यक्षा संयोजक हेमाताई चिंचोळकर, जिल्हा अध्यक्षा शाहिन शेख, माजी महापौर सुशिलाताई आबुटे, ॲड. करिमुन्निसा बागवान, अरुणा वर्मा, सुमन जाधव, प्रमिला तुपलवंडे आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना सव्वालाखे म्हणाले की, देशात, राज्यात भाजपा सरकार आल्यानंतर महिलांवर अत्याचार वाढले त्याविरुद्ध कोणी बोलायला तयार नाही. महागाई, बेरोजगारी वाढली. गॅस, पेट्रोल, डिझेलचे दरही वाढले. परवाच झालेल्या पदवीधर, शिक्षक, आणि कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा विजय झाला. आत्ता लोकांची मानसिकता बदलत आहे. महाराष्ट्रातील सर्व जनतेने आणि महिलांनी ठरविले आहे की येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत महागाई, बेरोजगारी वाढविणाऱ्या भाजपा आणि शिंदे सरकारचा पराभव करायचा, त्यामुळे २०२४ च्या त्यांचा पराभव निश्चित असल्याचंही त्या म्हणाल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"