काशिनाथ वाघमारे
सोलापूर : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु केलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी बार्शी तालुक्यातील सासुरे गावातील महिला सरसावल्या आहेत. वैशाली फुलचंद आवारे यांनी गावातच आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. तर घाणेगाव येथे तरूणांनी मुंडन करून निषेध व्यक्त केला आहे.
सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणी करीता आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनास पाठिंबा देण्याकरिता सासुरे येथे महिला छावा संघटनेच्या तालुकाध्यक्षा वैशाली फुलचंद आवारे यांनी सासुरे ग्रामपंचायती समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी संगीता आवारे, गीतांजली आवारे, सुप्रिया चव्हाण, जयश्री उमाप, अर्चना दळवी, अनुराधा देशमुख, वंदना पाटील, अर्चना आवारे ,राजश्री मोहिते यांच्यासह गावातील सर्व सकल मराठा बांधव उपस्थित होते. मराठा आरक्षणासाठी पहिल्यांदाच चुलबंद करून महिला आमरण उपोषणास बसल्या आहेत.या सह घाणेगावातील सकल मराठा समाजाने एक दिवसाचे लक्षणिक उपोषण केले. यावेळी सतीश नवले, अण्णासाहेब मोरे, रंजीत पाटील, दत्तात्रेय मोरे, संपत बचुटे, अक्षय पाटील, बबन काटे, करण कुटे, किरण शिंदे ,अमोल मोरे, अण्णासाहेब शिंदे, समाधान काटे उपस्थित होते.