सोलापूर : महिलांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे; मात्र त्या जर पदावर आल्या तर उत्कृष्ट काम करू शकतात. वंचित बहुजन आघाडीत महिला सुरक्षित असून, त्यांनी राजकारणात यावे, असे आवाहन वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रमुख नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केले.
डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यानिमित्त त्या आंबेडकर या सोलापुरात आल्या असता त्यांच्याशी ‘लोकमत’ च्या प्रतिनिधींनी संवाद साधला.
अंजली आंबेडकर बोलताना म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजकारणाला धम्माची जोड दिली आहे. महिलांनी केवळ चूल आणि मूल या संकल्पनेत न राहता, स्वत:च्या कक्षा व्यापक करण्याची गरज आहे. प्रत्येक महिलेने आपल्या सुना-बाळा,मुलींच्या मागे जिजाऊंप्रमाणे उभे रहावे. वैचारिक, सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक चळवळ महिलांनी उभी करावी.
वंचित बहुजन आघाडीमधील वंचित या शब्दाचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. जेव्हा या शब्दाचा अर्थ उलगडेल तेव्हा समाजातील सर्व जातीधर्मातील लोक जोडले जातील.
लोकसभा निवडणुकीच्यावेळी आपण आपल्या उत्साहातच राहिलो; मात्र अपयशाने खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागले पाहिजे. वंचित शब्दाचा अर्थ समजून घ्या, कोण कोण वंचित आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचा, आपापल्या परिसरातील मूलभूत प्रश्न उचलून धरा, सोलापुरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तो उचलून धरा, सच्चा कार्यकर्ता म्हणून स्वत:ला घडवा असेही प्रा. अंजली प्रकाश आंबेडकर यांनी महिलांना सांगितले.
संघाकडून संविधान बदलण्याचे षडयंत्रडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला एकसंध ठेवण्यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती केली. समतेवर आधारित भारतीय संविधान बदलण्याचे षडयंत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून केले जात आहे. आजच्या युगात महिला शिक्षणासह राजकीयदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे. शिवबाला जसे जिजाऊंने घडवले, डॉ. बाबासाहेबांच्या पाठीशी रमाई खंबीरपणे उभी राहिली त्यामुळे समाजात परिवर्तन झाले. त्यांचा आदर्श आजच्या महिलांनी घेण्याची गरज आहे. महिलांनी राजकारणात येऊन बदल घडवावा, महिलांनी महिलांचा मान राखला पाहिजे, असे मत वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले.