भीमानगर : ग्रामीण भागातील चवच न्यारी असते. हीच अनेक देशी-परदेशी लोकांना आपलीशी करते, आपल्या गावाकडची चव दिल्लीकरांना देण्यासाठी १५ महिलांना सावली फाऊंडेशन व वसुंधरा फाउंडेशनच्या माध्यमातून थेट विमानाने दिल्ली सफर करता आली व आपल्या गावाकडचा ब्रँड दिल्लीकरांना देता आला.
वसुंधरा वूमन्स फाउंडेशन, पुणे व सावली फाउंडेशन सोलापूर यांच्या विद्यमाने पुणे व सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांना थेट दिल्ली येथील जागतिक बाजारपेठेत झुणका-भाकर स्टॉल लावण्याची संधी प्रदर्शनात मिळाली. यामुळे दिल्लीकरांना झुणका-भाकर व पुरणपोळीची चव चाखता आली.
एन. एस. आय. सी. व सी.एस.सी.सी. च्या वतीने दिल्ली येथे अनुसूचित जाती-जमातीमधील महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन नुकतेच दिल्ली येथील कॉन्स्टीट्युशन क्लब येथे पार पडले. यात सावली फाउंडेशन सोलापूर व वसुंधरा वूमन्स फाउंडेशन पुणे यातील महिला बचत गटांनी सहभाग नोंदवला. सावली फाउंडेशन व वसुंधरा वूमन्स फाउंडेशनने अशा जागतिक दर्जाच्या बाजारपेठेत संस्थेच्या महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या, वस्तूंचे दोन स्टॉल लावण्याची संधी ग्रामीण भागातील महिलांना उपलब्ध करून दिली.
महाराष्ट्रातली इरकल नऊवार साडी-चोळी, सोलापूर चादर व हलव्याचे (तीळगूळचे) दागिनेदेखील प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. या सोलापुरी वस्तुंसोबतच अस्सल महाराष्टÑाची ओळख पटविणाºया या वस्तूंच्या आणि खाद्यपदार्थांच्या खरेदीसाठी दिल्लीकरांची झुंबड उडाली होती. विशेषत: यात महिलांचा सहभाग अधिक प्रमाणावर होता. फाउंडेशनच्या १५ महिलांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदविला. माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे व वसुंधरा वूमन्स फाउंडेशनच्या संस्थापिका कोमल साळुंखे-ढोबळे यांच्या सहकार्याने या महिलांना ही संधी मिळाली.