संतोष आचलारे
सोलापूर : हात काळे करून वाहनांची दुरूस्ती करण्यासाठी युक्तीपेक्षा शक्तीचीच अधिक गरज भासते. त्यामुळे हे काम पुरूषांचेच...आता असा समज अजिबात करून घ्यायचा नाही...कारण महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात काम करणाºया महिला मेकॅनिक अगदी सहजपणे लालपरीची दुरूस्ती करताना दिसून येतात ‘अन् हम भी कुछ कम नही’ असा संदेश मोठ्या आत्मविश्वासाने देतात.
सोलापूर आगारात तब्बल ३४५ हिरकणी लालपरीची सेवा करताना दिसून येतात. त्यांच्या कामात शिस्त आणि आत्मविश्वास असतो, असे सोलापूर आगार व्यवस्थापक मुकुंद दळवी, वाहतूक नियंत्रक एम.पी.मुदलीयार सांगितले. सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत बस यांत्रिकी विभागात बसला इंधन सोडणे, बसची किरकोळ दुरुस्ती करणे, बसची स्वच्छता करणे, बसमधील प्रकाशाची योग्य व्यवस्था या कामात महिला मेकॅनिक दिवसभर मग्न असतात, असे ते म्हणाले.
बसची दुरुस्ती करताना आम्ही पूर्ण क्षमतेने काम करतो. महिला म्हणून आम्ही कोठेही मागे राहत नाही अशी प्रतिक्रिया महिला मेकॅनिक भाग्यश्री चव्हाण, प्रतिभा काळे, उमा काळे,अनिता माने,रेश्मा आकडे यांनी दिली. लाल परीला लाल रंग पेंटींग करताना खूपच आनंद होतो. हे काम आम्ही प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो अशी प्रतिक्रिया पेंटिंगचे काम करणाºया पेंटर पूनम साळुंखे, सुप्रिया गावडे, अंजली लांडगे यांनी दिली.
इलेक्ट्रिक विभागात कार्यरत असलेल्या बॉडी फिटर यास्मीन शेख, स्मृती पंडित या बसमध्ये लाईटची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतात. हेडलाईट, आतील लाईट आदी सुस्थितीत ठेवण्यासाठी या विभागातील आधुनिक काळातील महिला राबतात.बसची स्वच्छता करताना आपल्या घराप्रमाणेच स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती स्वच्छता विभागातील मीना बोंबाळे यांनी दिली.भुयारात बस खाली जाऊन बसची यांत्रिक दुरुस्ती करण्याचे काम आम्ही करतो. बस लवकर सुरु व्हावी यासाठी अथक प्रयत्न आमच्याकडून करण्यात येतो असे यावेळी आर्ट सहायक गायत्री गायकवाड, सविता पुजारी, वंदना कांबळे यांनी दिली.
लालपरीच्या सेवेतील हिरकणी
- - वरिष्ठ कार्यशाळा अधीक्षक :१
- - भांडार अधिकारी : १
- - बस आगारप्रमुख : २
- - वाहतूक निरीक्षक : २
- - वाहतूक नियंत्रक :३
- - सहायक कारागीर : ५
- - वाहक : १७५
- - कार्यशाळा सहायक :४0
- - शिपाई :२
- - नाईक :२
- - स्वच्छक : १२
- - एकूण : ३४५