विलास जळकोटकर
सोलापूर: धन्याच्या बरोबर दिवसभर राबराब राबायचं.. त्यंच्या जोडीला पदर खोचून काम करावं तवा चार पैसे मिळत्यात आन् मगच चूल पेटवावी लागत्ये. आम्हालाबी लई वाटतंय थोरामोठ्याप्रमाणं आपली बी जिंदगी सुधरावी, पण नुसतंच म्हणून काय उपेग. कर्जपाणी काढून कायतर करावं म्हणलं तर तितं कायतरी कारण सांगून अडवं लावत्यात. सरकारनं आमचं गाºहाणं ऐकून मदत करावी, अशी व्यथा लोहार, घिसाडी समाजातील माय-माऊलींसह कर्त्या मंडळींनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
सोलापूर शहरात सध्या १२०० च्या आसपास लोहार, घिसाडी समाज वास्तव्यास आहेत. प्रत्यक्षात भात्याद्वारे लोखंडी अवजारे करून आपली उपजीविका करणारी १०० कुटुंबं आहेत. अन्य वर्ग वेगवेगळ्या व्यवसायामध्ये विखुरला आहे. श्रमाचं काम म्हणून नवी पिढीही या व्यवसायाकडं धजावत नाही. पुरुषांच्या जोडीला या व्यवसायात महिलांना दिवसभर भात्यावर कधी कातीन ओढत तर कधी हातोडीने ऐरणीवर तापलेल्या लोखंडावर घाव घालण्याचे काम करावे लागते. परिस्थितीमुळे शिक्षणाचं प्रमाण कमी आणि त्यामुळं पारंपरिक व्यवसायावरच गुजराण करावी लागते, हे वास्तव पोलीस मुख्यालयाच्या जवळ असलेल्या झोपडपट्टीतल्या समाजबांधवांचं नेतृत्व करणाºया बालाजी साळुंखे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केलं.
काळ बदलतोय तसं आमच्या समाजातील महिला, पोराबाळांनाही बदलावंसं वाटतंय. पण शिकल्यासवरल्या पोरांनाही सरकारकडून सोयी मिळत नाहीत. कर्ज प्रकरणं करावी म्हणलं तर कोणी दाद लागू देत नाही. सरकारनं सहानुभूतीनं आमच्याकडं पहावं. आमच्या नशिबी असलेलं ऐरणीवर घाव घालण्याचे दिवस संपावेत, असं राहून राहून वाटतंय, अशी व्यथा सोलापूर-पुणे महामार्गावर जालनाहून आलेले राम पवार, सचिन पडुलकर कुटुंबीयांनी व्यक्त केली.
पडुलकर यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालंय. लोहारकाम करणं हेच त्यांचं चरितार्थाचं साधन आहे, त्यासाठीच भटकंती करत सोलापूर मुक्कामी आले आहेत. त्यांना तीन मुली असून, परिस्थितीमुळं त्यांच्या शिक्षणाचाही पत्ता नाही. शेतीसाठी लागणारी कुºहाड, फास, बेडगे, फावडे, खोºया, खुरपे, विळ्या, सत्तूर, पहार, शेर, अडणी अशी अवजारे तयार करायची आणि गावोगावी विकून त्यावर संसार चालवायचा हे या कुटुंबाचं जगणं. ही व्यवस्था बदलली पाहिजे.
सन्मानानं जगण्याचा हक्क मिळावा!पोलीस मुख्यालयालगत असलेल्या राहुल गांधी झोपडपट्टीत पन्नासेक घिसाडी कुटुंबं वास्तव्यास आहेत. भवानी पेठ, वैदू वस्ती, हनुमान नगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी हा समाज लोखंडी अवजारे तयार करतो. शहर-जिल्ह्यात हा समाज विखुरला आहे. आर्थिक चणचणीमुळे शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळे पारंपरिक व्यवसायावर यांची गुजरण सुरू आहे. सरकारच्या जाचक अटींमुळेही सवलतीचा फायदा मिळत नाही, यावर तोडगा काढून सन्मानानं जगण्याचा हक्क मिळावा, अशी मागणी बालाजी साळुंखे यांच्यासह बांधवांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.