राजकुमार सारोळे
सोलापूर : सकाळी शाळेची वेळ, मुलांची घरात आवराआवर, घड्याळाकडे लक्ष आणि दररोज बरोबर ठरलेल्या वेळेत कॉलनीत हॉर्नचा आवाज आला की मुले धावत घराबाहेर येतात, दीदी आली. गेल्या आठ वर्षांपासून स्कूलबस चालविणारी पूजा नारायण डुरे (रा. न्यू बुधवारपेठ, सम्राट चौक) हिने रोजगाराचा मार्ग शोधलाय.
पूजा या स्कूलबस चालवितात. दररोज सकाळी नागेश करजगी आॅर्किड स्कूल, दमाणी विद्यामंदिर, जैन गुरुकुल, गांधी नाथा शाळेतील लहान मुलांना ने-आण करण्याची जबाबदारी त्या पार पाडतात. स्कूलबसच्या माध्यमातून दमाणीनगर, मुरारजीपेठ, नवीपेठ, सम्राट चौक ते शेळगीपर्यंत ती सेवा देते. वडील नारायण डुरे हे गेल्या ३५ वर्षांपासून रिक्षा चालवितात. दोन बहिणींचे लग्न झाले व भाऊ लहान आहे. बारावीनंतर पूजा यांनी यशवंतराव मुक्त विद्यापीठातून बी. ए. सुरू केले आहे. सध्या त्या दुसºया वर्षात शिकत आहेत. फक्त रविवारी वर्ग असतात, इतर दिवशी ती स्कूलबस चालविण्याचे काम करतात.
वडील रिक्षा चालवितात, त्यातून प्रेरणा मिळाली असे ती सांगते. वडिलांबरोबर रिक्षा चालविण्याचे तिने धडे घेतले. यातून स्कूलबस सुरू करण्याचे तिने ठरविले. त्याप्रमाणे सन २०११ पासून तिने सुरुवात केली. सर्व शाळांकडे अनेक जण स्कूलबस सेवा देतात.
पूजाचे काम पाहून अनेक जण अचंबित झाले, पण तिने अत्यंत जबाबदारीने काम सुरू केल्याने सर्वांचा विश्वास वाढला. दररोज घरातून मुलांना घेऊन शाळेत वर्गापर्यंत नेऊन सोडणे व शाळा सुटल्यावर घरी नेऊन पोहोच करण्याची जबाबदारी ती पार पाडते. यावेळी लहान मुले तिच्याशी संवाद साधतात. दीदीकडून चॉकलेट त्यांना हव्या असतात. यातील मुलांचा वाढदिवस बसमध्येच साजरा केला जातो.
मोठी बस घेण्याचे स्वप्नवडील रिक्षा चालवितात, मग आपण मागे का या विचाराने स्कूलबस चालविण्यास शिकले, असा अनुभव पूजा यांनी सांगितला. आई म्हणाली, कशाला फंदात पडतेस, शिकून मोठी हो. पण स्कूलबसमुळे घरखर्चाला हातभार लागला व शिक्षणही सुरू आहे. स्कूलबस, रिक्षा आणि बुलेट चालविण्याची आवड आहे. आता भविष्यात मोठी बस घेऊन चालविण्याचे स्वप्न असल्याचे पूजा यांनी सांगितले.