संजय शिंदे
सोलापूर : सुनंदा मल्लिकार्जुन पांढरे... वय वर्षे ४२... पोस्टमन असलेल्या पतीच्या आकस्मिक निधनानंतर धीर खचू न देता पोस्टमनचीच नोकरी पत्कारून आपल्या तीन मुलांसह संसाराचा गाडा मोठ्या धैर्याने हाकणारी ही जिद्दी महिला... एकीकडे ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता अखंडपणे सेवा करीत लोकांचे सुख-दु:खाचे निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची धडपड तर दुसरीकडे हे काम आटोपून आपल्या घराकडे, मुलांकडे लवकरात लवकर परतण्याची ओढ... गेल्या सहा वर्षांपासून सुनंदा यांची ही कसरत सुरू आहे.
सोरेगाव डाक कार्यालयात पोस्टमन म्हणून सेवेत असलेल्या सुनंदा या दररोज औराद येथून ये-जा करतात. त्यांचे पती मल्लिकार्जुन पांढरे यांचे २०११ मध्ये आकस्मिक निधन झाले. दोन मुली व एक मुलागा ही आपत्ये, आता काय करायचे असा विचार न करता पतीच्याच जागेवर अनुकंपावर २०१३ मध्ये त्या पोस्टमन म्हणून डाक सेवेत रुजू झाल्या. सकाळी सात वाजता गावाकडून निघून त्या सोरेगाव डाक कार्यालयात पोहोचतात.
तेथून त्यांच्या क्षेत्रातील पत्रे, पार्सल घेऊन साडेदहा वाजता त्या बाहेर पडतात. तेथून सुरू होतो त्यांचा पत्रवाटपाचा प्रवास. निरनिराळ्या सोसायटी, अपार्टमेन्टस्, गल्ली... असा हा प्रवास साडेचार वाजेपर्यंत सुरू असतो. जुळे सोलापूरमधील एक बीट सुनंदा यांच्याकडे आहे. रोजच्या टपालांचा त्याच दिवशी बटवडा करून त्या सोरेगावच्या कार्यालयात पोहोचतात आणि सायंकाळी सहा वाजता पुन्हा औराद असा त्यांचा नित्य दिनक्रम. घर आणि नोकरी या दोन्हीलाही न्याय देऊन सुनंदा यांच्या जीवनाची वाटचाल सुरू आहे.
१५ किलोमीटरचा प्रवासएका पोस्टमनचे क्षेत्र ज्याला बीट असेही म्हणतात, हे पत्रांची संख्या व अंतर यावर ठरलेले असते. सुनंदा यांच्याकडे दररोज सरासरी १५० ते २०० टपाल असते व साधारणपणे १५ किलोमीटरचा रोजचा त्यांचा प्रवास होतो.