आठ मार्च जागतिक महिला दिन म्हणून आपण सारे साजरा करतो. त्यानिमित्ताने आज काही लिहावे अशी सूचना माझा मित्र डॉ. श्रीकांत कामतकर याने केली आणि माझ्या डोक्यात हा किडा वळवळायला लागला. एका सर्जनच्या दृष्टिकोनातून खरे तर या महिला दिनाचे काय महत्त्व असेल असा विचार मी करायला लागलो आणि मग लक्षात आले की महिला रुग्णांशी संबंधित ज्या काही माझ्या आठवणी आहेत त्या बºयापैकी पुरुषांशी संबंधित वा त्यांच्यावर अवलंबून आहेत म्हणजे मी असा विचार करायला लागलो की किती स्त्री रुग्ण हे निर्णयासाठी पुरुषांवर अवलंबून नाहीत आणि खरेच मला एकही रुग्ण असा आठवला नाही की जिने एखादा आरोग्या संबंधीचा महत्त्वाचा निर्णय पुरुषांच्या मदतीशिवाय किंवा पुरुषांच्या सल्ल्याशिवाय घेतलेला आहे. एक उदाहरण मला येथे जरुर नमूद करावेसे वाटते.
मला आठवते ती माझ्याकडे जर्मनीतून आलेली एक स्त्री रुग्ण. मूळची भारतीयच परंतु इंजिनिअर असल्याने लग्नानंतर नवºयाबरोबर जर्मनीत सेटल झालेली. सोलापुरात माहेर असल्याने दोन महिने विश्रांतीसाठी ती इकडे आलेली होती.? नेमके याच दरम्यान तिच्या पोटात दुखायला लागले. माझ्याकडे तपासण्यासाठी म्हणून आली आणि मी तिला अॅडमिट व्हायला सांगितले. कारण तिला होते अॅक्युट अपेंडिसायटीस. म्हणजेच तिच्या अपेंडिक्सला तीव्र सूज आल्याने तिच्या पोटात प्रचंड वेदना होत होत्या आणि तिला शस्त्रक्रियेची गरज होती आणि मी ते दुर्बिणीने म्हणजेच लॅप्रोस्कोपीने करणार होतो. अगदी जर्मनीतसुद्धा तिचे याच पद्धतीनेच आॅपरेशन झाले असते. पण अगदी माझ्या अपेक्षेच्या विरुद्ध तिने हॉस्पिटलमध्ये भरती होण्यास नकार दिला. आर्थिक अडचण नाही हे स्पष्ट दिसत होते. बरे,या स्त्रीला आॅपरेशन केले नाही तर काय गुंतागंत उद्भवू शकते हे स्पष्ट केले होते.
बºयाचदा अशा रुग्णात अपेंडिक्स फुटण्याची शक्यता असते आणि त्यामुळे जिवाला धोकाही संभवतो. हे अर्थातच तिला मी सांगितलेले होते. तिने सांगितलेले कारण मजेशीर होते. तिचा नवरा अजय (नाव बदललेले), जो जर्मनीत होता, तो दोन दिवसांनी सोलापुरात पोहोचणार होता त्यानंतर मात्र आॅपरेशन करण्यासाठी तिची पूर्ण परवानगी होती. या तरुण स्त्रीचे आई-वडील आणि भाऊ बरोबर असताना आॅपरेशनचा निर्णय मात्र तिने तिच्या पतीराजांवर सोपविला होता. कशीबशी ती माझ्याकडे अॅडमिट झाली. मी तिची ट्रीटमेंट करून दोन दिवस आॅपरेशन पुढे ढकलले.अर्थातच आॅपरेशनला होणाºया विलंबाची जबाबदारी मी या नातेवाईकांवर आणि प्रत्यक्ष रुग्णांवर सोपविली होती. तिच्या सुदैवाने अजय सोलापुरात पोहोचेपर्यंत तिचे अपेंडिक्स फुटले नाही आणि मग अजय आल्यानंतर तिचे आॅपरेशन दुर्बिणीने सुखरूप पार पडले.
एखाद्या अशिक्षित स्त्रीने असा निर्णय घेतला असता तर मला कदाचित फारसे वाईट वाटले नसते परंतु एका सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या स्त्रीने अशी जोखीम घ्यावी हे मला पटले नाही. अर्थातच अशी अनेक उदाहरणे आम्ही दैनंदिन जीवनात दररोज पाहतो. मुलाची किंवा स्वत:ची एखादी छोटीशी रक्त तपासणी करण्यासाठी सुद्धा स्त्रियांना आपल्या पतीराजांची परवानगी घ्यावी लागते. यामुळे चुकून एखाद्या स्त्रीने असा निर्णय घेतला आणि काही गडबड झाली तर त्याचे रुपांतर वादात होऊ शकते हेही आम्ही पाहिलेले आहे.बाळंतपणासाठी येणाºया स्त्रियांच्या बाबतीत तर ही गोष्ट आम्हा तज्ज्ञ डॉक्टरांना विशेष करून स्त्रीरोग तज्ज्ञांना नेहमीच जाणवते. बºयाचदा पहिली डिलिव्हरी ही माहेरी होते. प्रेमापेक्षा पहिल्या डिलिव्हरीचा खर्च मुलीच्या वडिलांनी करावा याच अपेक्षेने ही गोष्ट होते. डिलिव्हरीसाठी माहेरी आलेल्या मुलीच्या बाबतीतचे सारे निर्णय मात्र तिचा पती किंवा तिच्या सासरचे लोक घेत असतात.
जेव्हा तातडीने सिझेरियन सेक्शन करण्याची गरज भासते तेव्हा या विसंवादामुळे मुलीच्या व बाळाच्या जीवावर बेतण्याचे प्रसंगही आम्ही अनुभवतो. अनेक वेळा असेही होते की या तरुण मुलीचा नवरा परगावी असतो, त्याच्याशी मोबाईलवरून संवाद साधला जातो. जी काही तुटक माहिती त्याच्यापर्यंत पोहोचेल त्यावर आणि त्या तरुणाच्या बुद्धीवर व अनुभवावर या स्त्रीचे भवितव्य अवलंबून असते. इकडे त्या रुग्णाचा, त्याच्या नातेवाईकांचा आणि डॉक्टरांचाही जीव टांगणीला लागलेला असतो.
मला या क्षणी आज एक सर्जन म्हणून असे वाटते की स्वत:च्या आरोग्यासंबंधीचे निर्णय जेव्हा स्त्रीला घ्यायला पूर्णपणे मोकळीक असेल तोच खरा महिला दिन म्हणून आपल्याला साजरा करता येईल .-डॉ. सचिन जम्मा (लेखक लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत.)