सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमक्ष केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सीना व भीमा नदीवरील पुलामध्ये बॅरेजेस बांधण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात सीना नदीवर वडकबाळ येथे पूल बांधण्यात येत असल्याची माहिती भीमा—सीना संघर्ष समितीचे अध्यक्ष विलास लोकरे यांनी दिली.
केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री गडकरी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सोलापूर दौºयादरम्यान ९ जानेवारी रोजी ही घोषणा केली होती. महामार्गाच्या कामात सीना व भीमा नदीवरील पुलांमध्ये बॅरेजेस बांधण्याचा देशातील एकमेव प्रकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले होते. पण गडकरी यांनी ही घोषणा करण्यापूर्वीच विजयपूर महामार्गाचे टेंडर निघालेले आहे. त्यामुळे सध्या नव्याने बांधण्यात येणाºया पुलाच्या कामात बॅरेजेसचा समावेश करता येत नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे संचालक संजय कदम यांनी सांगितल्याचे लोकरे यांनी म्हटले आहे. वडकबाळ येथे पुलाचे काम प्रगतिपथावर असल्याचे दिसल्यावर संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी कदम यांची भेट घेऊन या कामाविषयी चर्चा केली. त्यावेळी कदम यांनी सद्यस्थितीत वडकबाळ येथे पुलाचे काम होणार असल्याचे स्पष्ट केले.
बॅरेजेस कशापद्धतीने बांधावयाचे याबाबत अद्याप मार्गदर्शन आलेले नाही. पण महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावर येणाºया टोलमधून काही रक्कम बॅरेजेस बांधण्यासाठी जलसंपदा विभागाकडेच वळती केली जाणार आहे. त्यामुळे बॅरेजेस उभारण्याचे काम जलसंपदा विभागच करेल असे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे चर्चेतून स्पष्ट झाले आहे.
बॅरेजेस बांधण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाचे नाही. त्यामुळे या विभागाकडून बॅरेजेस बांधण्याची रक्कम जलसंपदा विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहे. काम कोणत्या विभागाने करावे हे आम्हाला महत्त्वाचे नाही. पण कोणत्याही परिस्थितीत बॅरेजेस व्हावेत ही शेतकºयांची मागणी असल्याचे मंद्रुपचे माजी सरपंच अप्पाराव कोरे यांनी सांगितले. सध्या पुलाचे बीम उभारणीचे काम वेगात आहे. यात बॅरेजेस बांधण्याच्या रचनेचा संबंध नसल्याचे दिसून आल्यावर राष्ट्रीय महामार्ग अधिकाºयांशी चर्चा केली. त्यावरून पुलाच्या बाजूला जलसंपदा विभागाकडून बॅरेजेस उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे, असे कोरे यांनी सांगितले.
कामाला आला वेग- बॅरेजेस बांधणीच्या मागणीसाठी गेल्या महिन्यात शेतकºयांनी वडकबाळ येथील पुलाचे काम बंद पाडले होते. सांगली येथील कार्यक्रमात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री गडकरी यांनी बॅरेजेसबाबत घोषणा केली होती. त्यानंतर शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले. सोलापूरच्या दौºयात गडकरी यांनी ही बाब स्पष्ट केल्याने शेतकºयांना बॅरेजेसबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. सध्या पुलाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे सोलापूर ते विजयपूर दरम्यानच्या चौपदरीकरणास गती आली आहे.