रूपेश हेळवे
सोलापूर : राज्य शासनाने लॉकडाऊन पार्श्वभूमीवर बांधकाम कामगारांना दीड हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. घोषणा होऊन अनेक दिवस उलटले तरी अद्यापपर्यंत बऱ्याच बांधकाम कामगारांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे कामगार हवालदिल झाले आहेत. नोंदणी अन् पुर्ननोंदणीच्या त्रासामुळे त्यांना या मदतीपासून वंचित राहावे लागत आहे.
बांधकाम कामगार या प्रवर्गामध्ये बांधकाम क्षेत्रातील सोबतच वेल्डिंग, रंगरंगोटी, सुतार आदी कामगारांची नोंदणी केली जाते. या कामगारांची नोंदणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात केली जाते. त्यात ५० टक्के कामगारांनी नोंदणी केलेले आहे. उर्वरित कामगारांची नोंदणी अद्याप झालेली नाही. नोंदणीसाठी कर्मचाऱ्यांना इतर तालुक्यांमधूनही चकरा माराव्या लागत असल्यामुळे अनेक कामगार नोंदणी करत नाही. सोबतच प्रत्येक वर्षी कामगारांना पुनर्नोंदणी करावी लागते. अनेक कर्मचारी पुनर्नोंदणी करण्यासाठी अर्ज केल्यानंतर ती करत नाहीत. यामुळे ते कामगार शासनाने जाहीर केलेल्या व आतापर्यंतच्या कामगारांच्या विविध योजनांपासून वंचित राहात आहेत. त्यामुळे पुनर्नोंदणी लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.
दरम्यान, बांधकाम व्यवसाय सध्या ठप्प असल्यामुळे त्याचा परिणाम बांधकाम कामगारांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. पण सध्या अनेक कामगारांना आर्थिक मदत तर मिळत नाही सोबतच मानसिक आधारही मिळेना. त्यामुळे बांधकाम कामगार दडपण वाढत आहे. यामुळे या बांधकाम कामगारांना थोडी मदत व्हावी यासाठी शासनाने जाहीर केलेल्या बांधकाम कर्मचाऱ्यांना दीड हजार रुपयांचे आर्थिक मदतीपासून काही कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहे पण काही कर्मचारी अजूनही आर्थिक मदतीवाचून वंचित आहेत.
- नोंदणी झालेले बांधकाम कामगार - ९६,०००
- अनोंदणीकृत बांधकाम कामगार - १,६०,०००
मी मागील अनेक वर्षांपासून बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली आहे पण आतापर्यंत मला कोणत्याही प्रकारचे अर्थसहाय्य मिळालेले नाही. सोबतच शासनाने नुकतीच जाहीर केलेली आर्थिक मदत अद्यापपर्यंत मला मिळालेले नाही.
इस्माईल शेख, बांधकाम कामगार
मी नोंदणीकृत बांधकाम कामगार असून शासनाने जाहीर केलेली मदत मला नुकतीच मिळाली. यामुळे माझ्यावरचा थोडा ताण कमी झाला आहे. पण माझे बहुतांश सहकाऱ्यांना अशाप्रकारची मदत मिळालेली नाही.
चंद्रकांत हंचाटे, लाभार्थी
कोट
बांधकाम कामगारांची जेव्हा नोंदणी झाली त्यावेळी त्यामध्ये अनेक बोगस कामगारांची नावे जोडण्यात आली तसेच सध्या नवीन बांधकाम कामगार हे काही प्रमाणांतच नोंदविले गेलेले आहेत; पण जुना बांधकाम कामगारांची पुनर्नोंदणी न केल्यामुळे सध्याची कामगारांची संख्या कमी दिसत आहे. यामुळे पुनर्नोंदणी केलेल्या कामगारांनाही मदत मिळावी.
- साथी बशीर अहमद, प्रदेशाध्यक्ष लेबर पार्टी महाराष्ट्र