मोडनिंबचे ब्रिटिशकालीन प्रवेशद्वार म्हणजे गाववेशीचे पूर्वी ब्रिटिश काळामध्ये दगडी व पांढऱ्या मातीमध्ये बांधकाम केलेले आहे. तीन-चार वर्षांपूर्वी या बांधकामाचा कार्यकाल संपत आल्यामुळे व आजूबाजूचे दगड निखळून पडू लागल्यामुळे वेस धोकादायक झाली होती.
त्याच्या वरील बाजूस दोन खोल्यांमध्ये पोलीस चौकी होती व त्यामधूनच मोडनिंब व पंचक्रोशीतील गावांचा कारभार पोलीस पाहत होते.
सदरची वेस धोकादायक झाल्याने त्यावेळी ‘लोकमत’ने ‘पोलिसांचा जीव टांगणीला’ या शीर्षकाखाली बातमी दिली. त्यामुळे तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी पाहणी करून तत्काळ पोलीस चौकी अन्यत्र हलविली. मात्र, सदरची वेस व त्याखालून व जवळून सतत ये-जा करणाऱ्या नागरिकांना धोका पोहोचू नये म्हणून ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी रोटरी क्लबसह ॲड. विश्वंभर पाटील, मोडनिंबचे माजी सरपंच कैलास तोडकरी यांनी वर्गणी म्हणून निधी दिला.
मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी व या बांधकामासाठी पैसेच नसल्यामुळे सदरचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. मोडनिंब ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा करून हे काम तत्काळ सुरू करावे अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.