सोलापूर: जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची कोट्यवधी रुपयांची कामे शासकीय नियम, अटी व नियोजन सर्व निकष पायदळी तुडवून केली जात आहेत. यात काही लोकांच्या स्वार्थाला प्राधान्य दिले जात आहे. सांगोला बाह्यवळण मार्गासह जिल्ह्यातील सर्व कामांच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात यावी, अशी मागणी किसान आर्मी व वॉटर आर्मीचे संस्थापक नेते प्रफुल्ल कदम यांनी केली आहे. जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी नियोजनाच्या बाबींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही कदम यांनी केला आहे.
कदम म्हणाले की, कमी खर्चाचे योग्य पर्याय असताना जास्त खर्चाचे अत्यंत चुकीचे पर्याय निवडले आहेत. राष्ट्रीय महामार्ग कायदा १९५६ आयआरसी व टाऊन प्लॅनिंग, पर्यावरण आदींचा विचार करण्यात आलेला नाही. सांगोला बाह्यवळण मार्गाबाबतची ३ (अ) अधिसूचना प्रसिद्धीकरण ४ मार्च २०१८ रोजी झाले आहे. थ्रीडी प्रसिद्धीकरण भारत सरकारच्या गॅझेटमध्ये १८ जून २०१८ रोजी झाले. तथापि या कामाची ९५७ कोटी रुपयांची टेंडर नोटीस १२ आॅक्टोबर २०१७ रोजी देण्यात आली. या कामाचा कार्यारंभ आदेश संबंधित ठेकेदाराला २३ मार्च २०१८ रोजी देण्यात आला. अधिसूचना प्रसिद्ध होण्यापूर्वी, थ्रीडी होण्यापूर्वी आणि उपविभागीय अधिकाºयांकडे रितसर सुनावणी होण्यापूर्वीच ठेकेदाराला ठेका दिला आहे.
आमचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला विरोध नाही. जमिनीचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. नियमानुसार सर्व कामे झाली पाहिजेत. शासनाला अंधारात ठेवून कामकाज केले जात आहे. या विरोधात कमलापूर (ता. सांगोला) येथे मंगळवार, २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. रास्ता रोको आंदोलन होणार आहे. - प्रफुल्ल कदम, किसान व वॉटर आर्मी.