सोलापूर : सांगली-सोलापूर (महामार्ग क्रमांक- १६६) राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगात सुरू आहे़ नियोजित १९४ किलोमीटर चारपदरी रस्त्यापैकी आजघडीला ५० किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे़ या महामार्गाचे काम एकूण ४ पॅकेजमध्ये सुरू आहे. उर्वरित १४४ किलोमीटरचे काम वेगात सुरू आह़े़. १९४ किलोमीटरच्या चारपदरी महामार्गाकरिता एकूण सव्वाचार हजार कोटी रुपये निधी मंजूर आहे़ सांगली-सोलापूर यातील ८० ते ९० टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, काही ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे़ तेही काम लवकर पूर्ण होईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे.
सांगली ते बोरगाव या ४१ किलोमीटर रस्त्याचे काम पहिल्या पॅकेजमध्ये सुरू आहे़ याकरिता १००२ कोटी रुपये निधी मंजूर आहे़ यातील ४ किलोमीटरचे काम पूर्ण झालेले आहे़ २२ मे २०१९ रोजी कामास सुरुवात झाली असून, २२ मे २०२१ पर्यंत या ४१ किलोमीटरचे काम पूर्ण होईल़ दुसºया पॅकेजमध्ये बोरगाव ते वाटंबरेपर्यंतच्या ५२ किलोमीटरचे काम सुरु आहे़ याकरिता १०२५ कोटी रुपये निधी मंजूर असून, यातील १७ किलोमीटरचे काम पूर्ण झालेले आहे, उर्वरित ३५ किलोमीटरचे काम २० एप्रिल २०२१ पर्यंत पूर्ण होईल़ २२ एप्रिल २०१९ रोजी दुसºया पॅकेजच्या कामाला सुुरुवात झाली.
तिसºया पॅकेजमध्ये वाटंबरे ते मंगळवेढा या ४५ किलोमीटर रस्त्याचे काम सुरू आहे़ याकरिता ९५७ कोटी रुपये निधी मंजूर असून, यातील १७ किलोमीटरचे काम पूर्ण झालेले आहे़ उर्वरित २८ किलोमीटरचे काम ३० डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण होईल़ ३१ डिसेंबर २०१८ रोजी या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली़ चौथ्या पॅकेजमध्ये मंगळवेढा ते सोलापूर या ५६ किलोमीटरचे काम सुरु आहे़ याकरिता ११४१ कोटी रुपये मंजूर असून, यातील साडेआठ किलोमीटरचे काम पूर्ण झालेले आहे़ उर्वरित ४८ किलोमीटरचे काम २२ मे २०२१ पर्यंत पूर्ण होणार आहे़ २३ एप्रिल २०१९ रोजी कामास सुरुवात झाली.
भूसंपादनासाठी दोन हजार कोटी- सांगली-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भूसंपादनाकरिता एकूण दोन हजार कोटी रुपये निधी मंजूर आहे़ यातील बहुतांश निधी संबंधीत शेतकºयांना वाटप झाला आहे़ काही शेतजमिनींबाबत कोर्टात वाद, दावे प्रतिदावे तसेच आक्षेप आहेत़ त्यामुळे याठिकाणी भूसंपादन प्रक्रिया थांबली आहे़ ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात सुरू आहे़ सांगली ते बोरगाव रस्त्यावरील भूसंपादनाकरिता ८५८ कोटी रुपये, बोरगाव ते वाटंबरे याकरिता ४१६ कोटी रुपये, वाटंबरे ते मंगळवेढा याकरिता ३६० कोटी रुपये तसेच मंगळवेढा ते सोलापूर याकरिता ३६० कोटी रुपये निधी मंजूर आहे़ यातील ८० ते ९० टक्के निधी वाटप झाला आहे़