नगरपरिषदेच्या कर्मचारी व कामगारांना प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला वेतन अनुदान देणे गरजेचे असताना गेल्या दोन महिन्यांपासून राज्य शासनाकडून वेतन अनुदान आलेले नाही. नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांच्या नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांपासून वेतन झालेले नाही. शासनाने तत्काळ नगरपरिषदेस वेतन अनुदान द्यावे, या मागणीसाठी मंगळवारपासून करमाळा नगरपरिषदेसमोर कर्मचारी व कामगारांनी ठिय्या मांडून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
नगरपरिषद कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप शिंदे, सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष अनुप कांबळे यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी वीणा पवार यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी वैभव कांबळे, लक्ष्मण कांबळे, राजेंद्र कांबळे, स्वाती जाधव, सागर जगताप, मधुकर कांबळे, शिवदास आलाट, अभिजित आलाट, पुरण लालबेग, सुनील मेहतर आदी कामगार व कर्मचारी उपस्थित होते.
---