आप्पासाहेब पाटील, सोलापूर : बिंदू नामावलीत धनगर आरक्षणानुसार शिक्षक भरती व्हावी या मागणीसाठी धनगर समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या दालनाची तोडफोड केली. या तोडफोडीचा निषेध नोंदवित संबंधित आंदोलकांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील ११ पंचायत समितीमधील अधिकारी, कर्मचारी यांनी काम बंद आंदोलन केले. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून जिल्हा परिषदेत शांतता दिसून येत आहे.
दरम्यान, सोमवारी तोडफोड केलेल्या आठ जणांविराेधात सदर बझार पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळपासून जिल्हा परिषद आवारात अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येत आंदोलकांचा निषेध नोंदविला. सर्व विभागाचे कार्यालयात शुकशुकाट दिसून येत होता. एरव्ही वर्दळ असणारी कार्यालयं मंगळवारी ओस पडलेली दिसून आली. याबाबतची प्रतिक्रिया देताना मनिषा आव्हाळे म्हणाल्या की, पेालिस प्रशासनाकडून संबंधित आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे, पोलिस संबधितांवर कडक कारवाई करतील. अधिकारी, कर्मचारी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल आव्हाळे यांनी आभार व्यक्त केले.