सेवेत रुजू झाल्यापासून ते निवृत्तीपर्यंत सर्व नोंदी घडामोडी या सेवा पुस्तकांमध्ये लिखित असतात. मात्र बऱ्याच सेवापुस्तिका या अर्धवट अपूर्ण तसेच नोंदी चुकीच्या पद्धतीने घेतल्या जातात. त्या आनुषंगाने कार्यालयीन कामकाज सुधारणा अभियानांतर्गत झेडपीचे सीईओ दिलीप स्वामी यांच्या सूचनेवरून कर्मचारी अधिकाऱ्यांनी आपापली सेवापुस्तके अद्ययावतीकरण करा अशा सूचना बार्शी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर सावंत यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या आहेत.
बार्शी तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या सर्व विभागांचे एकूण एक हजार अधिकारी व कर्मचारी असून त्यापैकी एकूण ३४० सेवापुस्तकांची तपासणी केली आहे, तर २३५ अधिकारी-कर्मचाऱ्यांची परिपूर्ण सेवा पुस्तकाची संख्या आहे. तालुक्यात शिक्षण विभागाचे सर्वाधिक ६२० अधिकारी कर्मचारी आहेत. महसूल अधिकारी कर्मचारी यांचे सेवापुस्तकांतील अद्ययावतीकरण याकरिता व नियंत्रण करण्यासाठी एस. जी. बुवा, एस. एफ अडसूळ, ए. एस. कराड, एम. व्ही. माहुले, के. एन. खुर्द, ए. आय. साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चौकट
शिक्षक, ग्रामसेवक असो की इतर कर्मचारी हे सेवानिवृत्त झाले तरी दप्तर अद्ययावत नसल्याने पेन्शन, पदोन्नतीसह अनेक अडचणी येतात. या विषयाकडे आजपर्यंत कोणीच गंभीरपणे पाहिले नव्हते. मात्र झेडपीच्या सीईओनी हा महत्त्वपूर्ण विषय हाती घेतला आहे. यात बार्शी पंचायत समिती ही मागे राहणार नाही. २५ डिसेंबर पर्यंत १०० टक्के सेवापुस्तके अद्ययावत करावी, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
-अनिल डिसले, सभापती, पंचायत समिती
----