माळशिरस : राम राम पाहुणं... आमच्याकडे चहा घ्यायला यावं लागेल... असा आग्रह सर्वांना परिचित आहे. मात्र तुम्ही आमच्याकडे चहाला यायचं बरं का? असाही आग्रहाचा सूर सध्या कानी पडत आहे. चहापान ही पाहुणचाराची एक विशिष्ट पद्धत आहे. मात्र या कार्यक्रमाने अनेक हेतू साध्य होतात. प्रत्येक गोष्टीचे निमित्त चहापानानं होऊ शकते. कायम कामात व्यस्त असणाºयांना भेटण्यासाठी तासन्तास कार्यकर्त्यांना प्रतीक्षा करावी लागते. अशा नेतेमंडळींना सध्या कार्यकर्त्यांकडे चहाला जाण्यासाठी वेळ मिळत आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीचा माहोल तयार होत असून, कार्यकर्ते नेतेमंडळींना चहासाठी आमंत्रण देत आहेत तर काही नेतेमंडळी कार्यकर्त्यांकडे चहा घेण्याचा आग्रह धरताना दिसत आहेत. यातूनच राजकीय नेतेमंडळी कार्यकर्त्यांच्या घरी चहापान करताना दिसत आहेत.
चहापान हे आदरातिथ्यचे प्रतीक मानले जाते. सध्या लोकसभेच्या दृष्टीने अनेक खासदार, आमदार, मंत्र्यांचे दौरे वाढले आहेत़ काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन चर्चा करण्याच्या उद्देशाने चहापानाचे आमंत्रण देणे-घेणे यावर भर दिला जात आहे.
सध्या माढा मतदारसंघातील राजकीय हालचालींना मोठा वेग आला असून, माढ्यातील जनता, नेतेमंडळी व कार्यकर्ते यांचा नेमका अंदाज बांधणे सर्व पक्षांना जिकरीची गोष्ट आहे. जुन्या जमान्यातील नेतेमंडळी सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत असत. मात्र अलीकडे या राजकीय नेत्यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते व लोकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. यामुळे कार्यकर्ते व नेते यांच्यामधील जवळीकता टिकून राहत नाही. सध्या मात्र नेतेमंडळींना कार्यकर्त्यांशी जवळीक करण्याची गरज वाटू लागल्यामुळे अनेक नेतेमंडळी कार्यकर्त्यांना प्रतिसाद देताना दिसतात.
सोलापुरातही पक्षाचे नेते कार्यकर्त्यांच्या घरी जावून भेटीगाठी घेत आहे. कार्यकर्त्यांकडे गेल्यानंतर शेजारी मंडळींकडे त्यांना आमंत्रित केले जात आहे. तेथेही ते आपल्या पक्षाची ध्येय धोरणे सांगताना दिसून येत आहेत.
भाजपाच्या मंत्र्यांचे चहापान सरगर व पाटील यांच्या घरीच्गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या जिल्ह्यातील दोन मंत्र्यांचा दौरा तालुक्यात वाढला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या टंचाई आढावा बैठकीसाठी आलेल्या पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व नुकत्याच झालेल्या सोशल मीडिया कार्यकर्ता शिबिराच्या कार्यक्रमासाठी आलेले सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सरगर व भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या माजी झेडपी सदस्य संजीवनी पाटील यांच्या घरी जाऊन चहापान घेतला. याशिवाय इतर पक्षाचे खासदार, आमदार व नेतेमंडळी आपल्या अनेक कार्यकर्त्यांकडे चहापानाचा प्रस्ताव स्वीकारताना दिसत आहेत.