सोलापूर: लोकसभा निवडणुकीनंतर सुशीलकुमार शिंदे उद्या (सोमवारी) प्रथमच सोलापूरला येत आहेत. त्यांच्या दोन दिवसांच्या दौर्यात ते कार्यकर्ते, नेत्यांशी संवाद साधणार आहेत. सिद्धेश्वर एक्स्प्रेसने शिंदे यांचे आगमन होणार आहे. दिवसभर ते कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाची कारणमीमांसा करण्यासाठी काँग्रेस पक्षातील नेत्यांसमवेत चर्चाही करण्याची शक्यता आहे. मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. निवडणूक निकालानंतर प्रथमच त्यांचे सोलापुरात आगमत होत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्सुकता आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातील गटबाजीची चर्चा रंगत होती. मात्र खुद्द शिंदे यांनीच सर्वांना सबुरीचा सल्ला देऊन कामाला लावले होते. निकालानंतर पक्षातील संघर्ष उफाळून आला आहे. मताधिक्यावरुन शह-काटशहाचे राजकारण रंगले आहे. अंतर्गत धुसफुस आणि पक्षाच्या विरोधात काम केल्याचे आरोप-प्रत्यारोप शिंदे यांच्यासमोर होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल््यात भाजपाला आघाडी मिळाल्याने पक्षाच्या नेत्यांविरोधात कार्यकर्त्यांचा रोष आहे. नेत्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नसल्याची सार्वत्रिक चर्चा आहे. नेत्यांच्या परस्पर चुकांचा पाढा शिंदे यांच्यासमोर वाचण्याची तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे. मतदारसंघनिहाय कारणमीमांसा होण्याची शक्यता असल्याने लेखी अहवाल, गोपनीय राजकीय कुरघोड्या, तक्रारी मांडून पक्षांतर्गत विरोधकांना नामोहरम करण्याची संधी साधण्याची तयारीही काँग्रेसबरोबर राष्टÑवादी काँग्रेस पक्षातही सुरु आहे.
-------------------------
संघर्ष मिटणार का ? काल चिंतन बैठकीच्या निमित्ताने शहरातील काँग्रेसचे दोन गट आमने-सामने आले होते. त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली होती. मुंबईच्या चिंतन बैठकीतील वक्तव्यावरुन सोलापूर दक्षिण मतदारसंघात विशेषत: अल्पसंख्याक समाजात अस्वस्थता पसरली आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या दौर्यात या दोन्ही घटनांचे पडसाद उमटणार आहेत.
----------------------------
आणखी किती पदाधिकार्यांचे राजीनामे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, शहराध्यक्ष धर्मा भोसले यांच्यासह ब्लॉक कमिटीच्या अध्यक्षांनी आपल्या पदांचे राजीनामे प्रदेश अध्यक्षांकडे सादर केले होते. मुंबईच्या चिंतन बैठकीत सर्वांचेच राजीनामे नामंजूर केल्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर आता शिंदे यांच्या समोर आणखी किती पदाधिकारी राजीनामे देणार या विषयीची उत्सुकता आहे.