सोलापूर : रामलला आपल्या भव्य मंदिरात विराजमान होत असताना सोलापुरात एक लाख लोकांचा नवीन गृहप्रवेश होत आहे. २२ जानेवारीला आपण नवीन घरात गेल्यानंतर रामज्योती प्रज्ज्वलित कराव्यात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी कुंभारी येथील रे नगरात १५ हजार कामगारांना घरांचे वाटप झाले. यावेळी ते बोलत होते. मंचावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार होते. मोदी यांनी भाषणाची सुरूवात मराठीत केली.
पंढरपूरचा श्री विठ्ठल अन् सोलापूरचे ग्रामदैवत सिध्दरामेश्वर महाराजांना नमस्कार केला. २२ जानेवारीला रामललांची प्राणप्रतिष्ठा होणार असे म्हणताच उपस्थित जनसमुदायाने ‘जय श्रीराम जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या. मोदी म्हणाले, आपण २२ जानेवारीला रामज्योती प्रज्ज्वलित केल्या तर गरीबी नष्ट करण्याची प्रेरणा मिळेल.
अनेकदा घोषणा देण्यात आल्या; पण गरीबी कधीच हटली नाही -देशात ‘गरीबी हटाव’ च्या अनेकदा केवळ घोषणा देण्यात आल्या; पण गरीबी कधीच हटली नाही. ‘आर्धी भाकरी तरी खायला मिळेल’ असेही बोलले जायचे; पण का? आता मोदी आहे, तुम्हाला पूर्ण भाकरी मिळेल, असेही मोदी म्हणाले.
सांगितलं सोलापूर अन् स्वत:चं नातं -सोलापूर अन् स्वत:चं नातं सांगताना मोदी म्हणाले, सोलापूर ही श्रमिकांची नगरी आहे. माझं कार्यक्षेत्र अहमदाबाद आहे. तीही श्रमिकांची नगरी आहे. यंत्रमाग कामगार तेथेही आहेत. पद्मशालीे कुटुंबं अहमदाबादमध्येही आहेत. मी अनेकदा त्यांच्याकडे जेवायचो. छोट्या घरात राहायचे; पण जेऊ घालायचे. कधी त्यांना स्वत:ला जेवण मिळाले नाही; पण मला रात्री उपाशी झोपू दिले नाही, असेही मोदी म्हणाले....अन् पंतप्रधान मोदींच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले -सर्व सामान्य कष्टकरी लोकांना घर किती महत्वाचे असते याची जाणीव आहे. आज जे घर तुम्हाला मिळत आहे, ते पाहून मला असे वाटते की कदाचित मीही लहानपणी अशा घरात राहिलो असतो तर, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. अचानक त्यांचा आवाज कातर झाला आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.उपस्थित लोकही भावूक झाले -मोदी म्हणाले, २२ जानेवारी रोजी आयोध्येमध्ये प्रभू श्री रामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होत आहे. त्या दिवशी गरिबांचा अंधकार दूर होईल. तुमचे जिवन आनंदाने भरू जावो अशी सदिच्छाही त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भाषणाने उपस्थित लोकही भावूक झाले होतो.