विलास जळकोटकर
सोलापूर: माहिती तंत्राच्या युगात झपाट्याने क्रांती होत आहे. नवनवीन माहितीच्या शोधासाठी पूर्वी वाचनालयांकडे पाय वळायचे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून माहितीचा खजिना सहजसुलभ प्राप्त होऊ लागला. तरी वाचनालयांकडून वाचकांची अभिरुची लक्षात घेऊन साहित्याची उपलब्धी करून दिली जात आहे. दुर्मिळ पुस्तकांचे ई-बुक रुपांतर, डांबरगोळ्या, एखंडांचा उपयोग करुन पुस्तकांचं आयुर्मान वाढवलं जातंय.
‘पुस्तके वाचू या, वाचवू यात’ ‘शहाणे करु यात सकळजन’ हा वसा ९३३ वाचनालयांनी चालवला आहे. जागतिक पुस्तक दिनाच्या पार्श्वभूमीवर याचा वेध घेताना सोलापूर शहरामध्ये ९३३ वाचनालये कार्यरत असल्याचे आढळून आले. यामध्ये जिल्हा ग्रंथालय म्हणून हिराचंद नेमचंद वाचनालय. या शिवाय पूर्व भाग, ओम सच्चिदानंद सार्वजनिक आणि अक्कलकोटमध्ये एक अशी ‘अ’ दर्जाची वाचनालये कार्यरत आहेत.
जुन्या वाचनालयांपैकी एक असलेल्या हिराचंद नेमचंद सार्वजनिक वाचनालयांकडे विविध भाषांची तब्बल १ लाख ३५ हजार पुस्तकांच्या माध्यमातून आबालवृद्ध वाचकांची वाचनाची भूक भागवण्याचं काम अव्याहतपणे सुरु आहे. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी एकीकडे अनेक उपक्रम राबवले जात असताना पुस्तकांचेही आयुष्य वाढले पाहिजे यासाठी वाचनालयांमधून दर सहा महिन्याला पुस्तक मोजणी आणि त्यांची स्थिती तपासण्याची मोहीम घेतली जाते. दीर्घकाळ असलेल्या पुस्तकांची पृष्ठे एकमेकांना चिकटू नयेत आणि कीड लागू नये यासाठी पुस्तकांच्या अवतीभोवती डांबरगोळ्या, एखंडाचे खडे ठेवले जातात. जुन्या पुस्तकांना बायंडिंग करून ती जपण्याचे काम केले जाते. काही पुस्तके दुर्मिळ झाल्यामुळे त्यांची फोटो कॉपी स्कॅन करून संगणकावर सेव्ह करण्यात आली आहे. अन्यत्रही अशाच प्रकारे दक्षता घेण्यात येत असल्याचे हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर, ग्रंथपाल दत्ता शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
२० हजार पुस्तके वाचवणारे गुरुजी- शाळेमध्ये अध्यापनाचे धडे देताना पुस्तकांना जपले पाहिजे हा कानमंत्र घेऊन तो कृतीत साकारणाºया सम्राट चौकातील मोहनदास गुमते गुरुजींनी निवृत्तीनंतरही हा छंद अद्यापही जोपासला आहे. शाळा सुरु झाल्यानंतर पहिल्या तासालाच मुलांना वह्या -पुस्तकांना कव्हर घालण्याची सूचना द्यायची. ती करवून घ्यायचे हा शिरस्ता त्यांनी जपला आहे. ३० वर्षे सेवेनंतरही ते हा वसा जपतात. झेरॉक्स मशिनला वापरणाºया कागदांच्या बंडलचे प्लास्टिक वेस्टन घरी आणून आजही ते वाचनासाठी आणलेले पुस्तक कव्हर लावून परत करतात. आपल्या परिचयाच्या मंडळींकडे जाऊन त्यांच्या शाळकरी मुलांना पुस्तकांचे महत्त्व सांगून स्वत: काही पुस्तकांना कव्हर घालून त्यांना उद्युक्त करतात. आजवर २० हजार पुस्तकांना त्यांनी कव्हर घालून आपला छंद जोपासला आहे.