नासीर कबीर । करमाळा : निसर्ग कधी कधी कुणावर अन्याय करतो. एखाद्याला धडधाकट शरीर देतो तर दुसºयाला अपंगत्व. मात्र जगण्याचा दृष्टिकोन मोठा असला तर कसलाही अडथळा आड येऊ शकत नाही, हेच खरे ! जेऊरमधील बालाजी मंजुळे या दगडफोड्याच्या मुलाने आपला डावा डोळा निकामी असूनही प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. गरिबीसोबत आलेले सारे अडथळे पार केले आणि जिल्हाधिकारी होण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले. त्या जिद्दी बालाजी दिगंबर मंजुळे यांचा हा जीवनप्रवास !
घरात अठराविश्व दारिद्र्य. आई पार्वती व वडील दिगंबर हे गावागावांत जाऊन दगड फोडून पोटाची खळगी भरत असे. बालाजींना एकूण सात भावंडे. मुलांनी शिक्षण घ्यावे, मोठे व्हावे, अशी आईवडिलांची मनोमन इच्छा होती. बालाजींचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रसंगी घरातील भांडी विकावी लागली, तरी त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. आईवडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनीही कधी जिद्द सोडली नाही. त्यांना वाचन आणि अभ्यासाचे वेड भारी. जेऊर येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळा, महाविद्यालयातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पाचवी ते दहावीपर्यंत त्यांनी पहिला क्रमांक कधी सोडला नाही.
बालाजी जन्मजात डाव्या डोळ्याने अंध नव्हतेच. वीज नसल्याने चिमणीच्या प्रकाशात ही भावंडे अभ्यास करायची. अशातच सातवीला असताना डोळ्यात गरम काजळी गेली. डाव्या डोळ्याची दृष्टी हळूहळू कमी व्हायला लागली. डॉक्टरांनी त्या डोळ्यावर ताण न देण्याचा सल्ला दिला. बालाजींचे वाचनाचे वेड कमी व्हावे, डोळ्याला इजा पोहोचू नये म्हणून थोरले भाऊ-बहीण पुस्तके लपवून ठेवत असत. तरीही त्यांनी जिद्दीने युपीएससीचा अभ्यास पूर्ण केला. आलेल्या प्रसंगाला तोंड देत परिश्रमपूर्वक आयएएस पदवी २०१२ मध्ये प्राप्त केली. यश पदरात पडले, मात्र व्हायचा तो परिणाम झाला. डावा डोळा निकामी झालाच.
राजस्थानमध्ये सध्या निरीक्षक- बालाजी मंजुळे मुंबई येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असून, सध्या राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून जबाबदारीवर आहेत. यापूर्वी त्यांनी आंध्रप्रदेश सचिवालयात उपसचिव, कृषी आयुक्त या जबाबदाºया पार पाडल्या आहेत.