समीर इनामदारसोलापूर : केवळ ०.३६ टक्के वनक्षेत्र असणाºया सोलापूरची ओळख आता ‘राज्याचे वाळवंट’ अशी बनली आहे. ती पुसायची वेळ सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांवर आली आहे. आताच याबाबत जागरुकता आली नाही, तर भविष्यात हे संकट आणखी गहिरे होऊन जाणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यात किमान ३३ टक्के इतके वनक्षेत्र आवश्यक असताना त्या तुलनेत अवघे ०.३६ टक्के इतके क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात राहिले असल्याची माहिती राज्याच्या वनसंरक्षण विभागाने प्रफुल्ल सारडा यांनी विचारलेल्या माहितीच्या अधिकारानंतर दिली आहे. इतकी बिकट परिस्थिती सोलापूर जिल्ह्याची झाली असताना, याची कुणाला खंत आहे ना खेद.
सोलापूरचे वनक्षेत्र कोणत्या पद्धतीने वाढले जाईल, याचा कोणताही कार्यक्रम हाती घेण्यात आलेला नाही. केवळ शासकीय सोपस्कार पुढे नेण्यात येत आहेत. उद्दिष्ट पूर्ण करण्याशिवाय या कार्यक्रमाचे काही महत्त्व उरलेले नाही. मागील वर्षी नऊ लाख झाडांचे वृक्षारोपण केल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. यंदा १६ लाख वृक्षांचे रोपण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वनविभागाने २२ लाख वृक्षारोपणाची तयारी केली असून, २७ लाख रोपे तयार ठेवल्याचे वनविभागाने सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात अधिकाधिक वृक्ष लावले पाहिजे, असे सांगितले. सोलापूरची स्थिती इतकी बिकट असताना सर्व विभागाला या कामी सहभागी करून घेतल्यानंतरच सोलापूर पर्यावरणीय दृष्टीने चांगल्या दिशेने पावले उचलेल; अन्यथा सोलापूरची स्थिती हाताबाहेर गेलेली असेल, यात शंका नाही.
सोलापूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, गैरशासकीय संस्था, पर्यावरणात काम करणाºया संस्था, ज्येष्ठ नागरिक संघटना यांना हाताशी धरून कोट्यवधी झाडांची लागवड केल्यानंतर सोलापूरच्या वनक्षेत्राचे प्रमाण वाढू शकेल. शौचालयाप्रमाणे झाडे लावणे आवश्यक केल्याशिवाय झाडांचे प्रमाण वाढणार नाही. मोकळ्या किंवा पडीक जमिनीवर अधिकाधिक प्रमाणात वृक्षारोपण करण्यासाठी शासकीय संस्थांसह सर्वांनीच पुढे येणे आवश्यक बनले आहे.
वनक्षेत्राबद्दल ‘ब्र’ही नाही!- सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८९५ चौरस किलोमीटर असून, त्यापैकी ५३ चौरस किलोमीटर क्षेत्रावर वनराई आहे. त्यात ३७ चौरस किलोमीटर दाट आणि १६ चौरस किलोमीटर खुले क्षेत्र आहे. खुरट्या वनांचे क्षेत्रदेखील इथे अवघे १६ चौरस किलोमीटर आहे. इतकी भयानक स्थिती सोलापूरची झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील वनविभागाचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होते आहे. वनविभागाच्या जागा इतरांना दिल्या जात आहेत. त्याबाबत कोणी ‘ब्र’ही काढताना दिसलेले नाही.